माऊंट मांगनुई : भारतीय क्रिकेट टीम ही सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. तर दुसरीकडे अंडर-१९ टीम दक्षिण आफ्रिकेमध्ये वर्ल्ड कप खेळत आहे. भारतीय क्रिकेट टीमने रविवारी भारतीय अंडर-१९ टीम आणि बांगलादेश यांच्यातली वर्ल्ड कप फायनल मॅच बघितली. बीसीसीआयने भारतीय खेळाडूंचा मॅच बघतानाचा एक फोटो ट्विट केला आहे.
बीसीसीआयने ट्विट केलेल्या फोटोमध्ये प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासोबत रोहित शर्मा, कुलदीप यादव, विराट कोहली, रवींद्र जडेजा यशस्वी जयस्वालची बॅटिंग बघत आहेत. पाकिस्तानविरुद्धच्या सेमी फायनलमध्ये शतकी खेळी करणाऱ्या यशस्वी जयस्वालने सर्वाधिक ८८ रनची खेळी केली.
Cheers all the way from New Zealand for the #U19.#TeamIndia #U19CWC pic.twitter.com/WaZEIKeqcz
— BCCI (@BCCI) February 9, 2020
यशस्वी जयस्वालच्या या खेळीनंतरही भारताला मोठी मजल मारता आली नाही. बांगलादेशने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर भारताचा १७७ रनवर ऑल आऊट झाला.
याआधी २०१८ साली झालेल्या अंडर-१९ वर्ल्ड कपवरही भारताने नाव कोरलं होतं. आता ही ट्रॉफी वाचवण्याचं खडतर आव्हान भारतीय बॉलरपुढे असणार आहे. भारतीय टीमने आतापर्यंत ४ वेळा अंडर-१९ वर्ल्ड कप जिंकला आहे. २०००, २००८, २०१२ आणि २०१८ साली भारत अंडर-१९ वर्ल्ड कप चॅम्पियन बनला होता.
न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय टीमने वनडे सीरिज गमावली आहे. या सीरिजची तिसरी आणि शेवटची मॅच मंगळवारी खेळवण्यात येणार आहे. या मॅचनंतर २ टेस्ट मॅचची सीरिज खेळवली जाईल. वनडे सीरिजआधी झालेल्या टी-२० सीरिजमध्ये भारताचा ५-०ने विजय झाला होता.