कोलकाता : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बीसीसीआयची प्रतिमा बदल स्वीकार न करण्याची झाली आहे. टी-२० क्रिकेटला सुरुवात झाली तेव्हा भारताने यात फार रस घेतला नाही. एवढच नाही तर २००७ टी-२० वर्ल्ड कपआधी भारताने फक्त १ टी-२० मॅच खेळली होती. यानंतर डीआरएसलाही बीसीसीआयने सुरुवातीला विरोध केला. आता डे-नाईट टेस्ट मॅचसाठीही बीसीसीआय फारशी अनुकूल नाही. पण सौरव गांगुली बीसीसीआयचा अध्यक्ष होताच भारताची डे नाईट टेस्ट मॅचसाठी भूमिका बदलू शकते.
सौरव गांगुली २३ ऑक्टोबरला बीसीसीआयची सूत्र हातात घेणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये डे-नाईट टेस्ट मॅचचा पर्याय असेल, तर भारत मागे राहण्यापेक्षा पुढे यावं, असं गांगुलीने सांगितलं आहे. अध्यक्ष झाल्यावर डे-नाईट टेस्टचा मुद्दा असेल, यावर आम्ही काम करू. याबाबत आताच बोलणं लवकर होईल. एकदा पद सांभाळल्यानंतर आम्ही प्रत्येक सदस्य यावर बोलू, असं गांगुली म्हणाला.
भारतीय टीमचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री वेस्ट इंडिजमध्ये डे-नाईट टेस्ट खेळायला तयार झाले होते, पण नंतर त्यांनी प्रशासकीय समितीला पत्र लिहीलं. भारतीय टीम यासाठी तयार नाही गुलाबी बॉलने खेळण्यासाठी भारतीय टीमला १२-१८ महिन्यांचा वेळ लागेल, असं या पत्रात लिहिण्यात आलं होतं.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये डे-नाईट टेस्ट मॅच खेळण्याचं प्रावधान नाही, असा काहींचा समज आहे, पण हे मानणं चूक आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये डे-नाईट टेस्ट आहे. ऍडलेडमध्ये गुलाबी बॉलने डे-नाईट टेस्ट मॅच होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये डे-नाईट टेस्ट नसेल, असं मला वाटत नाही, असं गांगुलीने सांगितलं. जर २ टीममध्ये सहमती झाली तर टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये डे-नाईट मॅच खेळण्याचं प्रावधान आहे, असं आयसीसीच्या एका अधिकाऱ्यानेही स्पष्ट केलं आहे.