Suryakumar Yadav: टीम इंडिया सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असून या ठिकाणी टी-20 सिरीज खेळवली जातेय. 3 सामन्यांच्या या टी-20 सिरीजमध्ये पहिल्या सामन्यात पावसाने खोडा घातला. तर दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा 5 विकेट्सने पराभव झाला आहे. सिरीजमध्ये पहिल्या पराभवाचा सामना केल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने पोस्ट प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये कारण स्पष्ट केलं आहे. पाहूयात टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव नेमकं काय म्हणाला.
दुसऱ्या टी-20 सामन्यात देखील पावसाने हजेरी लावली होती. पाऊस आल्याने डकवर्थ लुईसच्या नियमानुसार, दक्षिण आफ्रिकेला 15 ओव्हर्समध्ये 152 रन्सचं लक्ष्य देण्यात आलं होतं. अखेरीस दक्षिण आफ्रिकेने 5 विकेट्सने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. यावेळी सामन्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने मैदानातील दवामुळे ओल्या होणाऱ्या चेंडूला जबाबदार धरलंय. त्याच्या या विधानानंतर चाहत्यांनी मात्र सूर्या पराभवाची जबाबदारी झटकत असल्याचं म्हटलंय.
दक्षिण आफ्रिकेविरूद्ध झालेल्या पराभवानंतर टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने सामन्या दरम्यान ओल्या झालेल्या बॉलला पराभवासाठी जबाबदार धरलं आहे. सूर्यकुमार म्हणाला, दक्षिण आफ्रिकेने 5-6 ओव्हर्समध्ये उत्तम फलंदाजी केली. यावेळीच त्यांनी सामना आमच्यापासून हिरावून घेतला. आम्ही मैदानावर मोकळेपणाने खेळणार होतो. मात्र ओल्या झालेल्या बॉलमुळे गोलंदाजी करणं कठीण झालं. परंतु भविष्यात आम्हाला अशाच परिस्थितींना सामोरं जावे लागेल.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा टी-20 सामना गकेबरहामध्ये खेळवला गेला. या सामन्यात साऊथ अफ्रिकेने टीम इंडियाचा धुव्वा उडवला. दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान आणि उसळत्या खेळपट्ट्यांवर टीम इंडियाच्या फलंदाजांनी 180 धावा उभ्या गेल्या होत्या. मात्र, पावसामुळे साऊथ अफ्रिकेला 15 ओव्हरमध्ये 152 धावांचं आव्हान मिळालं होतं. त्यांनी 7 बॉल बाकी असताना आव्हान पूर्ण केलं.
या सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादवने उत्तम खेळी केली. कर्णधार सूर्याने शानदार अर्धशतक झळकावलं. या खेळीदरम्यान सूर्याने चौकार आणि षटकारांचा मैदानावर पाऊस पाडला. मात्र अखेरीस मोठा फटका मारण्याच्या नादात शम्सीच्या बॉलवर सूर्याने आपली विकेट गमावली. सूर्याने 36 बॉल्समध्ये 56 रन्सची खेळी खेळली.