Suryakumar Yadav Injury Updates: टी 20 वर्ल्डकप सुरु असून टीम इंडियाने सुपर 8 मध्ये धडक मारली आहे. सुपर 8 मध्ये टीम इंडियाचा पहिला सामना अफगाणिस्तानशी होणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी टीम इंडियाला एक मोठा धक्का बसला आहे. या सामन्यापूर्वी भारताचा स्टार खेळाडू आणि टी-20 फॉर्मेटचा नंबर 1 खेळाडू सूर्यकुमार यादव जखमी झाला आहे. यामुळे टीम इंडियाच्या अडचणी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.
सुपर 8 मध्ये टीम इंडियाचा पहिला सामना 20 जून रोजी अफगाणिस्तानशी होणार आहे. या सामन्यापूर्वीच सूर्यकुमार यादव जखमी झाल्याने चाहत्यांसह टीमलाही मोठा धक्का बसला आहे. आयसीसी वर्ल्ड टी-20 रँकिंगचा नंबर-1 फलंदाज सूर्यकुमार यादव नेट प्रॅक्टिस दरम्यान जखमी झाला. थ्रो डाऊनचा सामना करत असताना बॉल त्याच्या हाताला लागला. यावेळी लगेचच फिजिओ आला आणि सूर्यावर उपचार करण्यात आले.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये सूर्याला खूप वेदना होत असल्याचे दिसले. दुखापत होताच फिजिओने सूर्याला तत्काळ उपचार दिले. यादरम्यान एक चांगली गोष्ट म्हणजे सूर्याची दुखापत फारशी गंभीर नसल्याचं समोर आलं आहे. पेनकिलर स्प्रेनंतर सूर्याने पुन्हा फलंदाजी केली. ज्यावेळी सूर्यकुमारला दुखापत झाल्याचं समोर आलं तेव्हा टीम इंडियाचे मुख्य कोच राहुल द्रविड खूप स्ट्रेसमध्ये दिसून आले. यावेळी ते सूर्याजवळ उभे होते. त्याचप्रमाणे द्रविडने सूर्या आणि फिजिओ दोघांशीही चर्चा केली.
यादरम्यान खेळाडूंनी केवळ थ्रो डाऊनचाच सराव केला नाही तर मुख्य गोलंदाजांचाही सामना केला. राहुल द्रविड आणि उर्वरित कोचिंग स्टाफनेही खेळाडूंकडून थ्रो डाउन सराव करवून घेतला.
अमेरिकेविरुद्धच्या लीग स्टेज विरूद्धच्या सामन्यात सूर्याने कठीण परिस्थितीत नाबाद अर्धशतक झळकावून टीमला विजय मिळवून दिला. या विजयानंतर टीमने सुपर-8 मध्ये स्थान मिळवलं. मात्र, यापूर्वी आयर्लंड आणि पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यांमध्ये सूर्याला चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे आगामी सामन्यांमधून सूर्याच्या खेळीवर सर्वांचं लक्ष असणार आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंडित आणि हार्दिक पंड्या