....अन् रोहित शर्माने सरफराज खानच्या पाठीतच बुकी घातली; मैदानातील VIDEO तुफान व्हायरल

भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियात असून, Prime Minister's XI संघाविरोधात दोन दिवसांचा सराव सामना खेळत आहे.   

शिवराज यादव | Updated: Dec 1, 2024, 03:16 PM IST
....अन् रोहित शर्माने सरफराज खानच्या पाठीतच बुकी घातली; मैदानातील VIDEO तुफान व्हायरल title=

भारतीय क्रिकेट संघ सध्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीनिमित्त ऑस्ट्रेलियात आहे. पहिला सामना भारतीय संघाने जिंकला असून, सध्या संघ Prime Minister's XI संघाविरोधात दोन दिवसांचा सराव सामना खेळत आहे. हा सामना खेळताना कर्णधार रोहित शर्मा आणि सरफराज खान यांच्यातील एका क्षणाचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. व्हिडीओत रोहित शर्मा गचाळ क्षेत्ररक्षण करणाऱ्या सरफऱाज खानच्या पाठीवर बुक्की मारताना दिसत आहे. 

ऋषभ पंतच्या जागी सरफराज खान यष्टीरक्षण करत होता. यादरम्यान एका चेंडूवर तो गोंधळलेला दिसला. जॅक क्लेटन बाद झाल्यानंतर फलंदाजीला आलेल्या ऑलिव्हर डेव्हिसला हर्षित राणाने शॉर्ट पिच चेंडू टाकल्यानंतर डावाच्या 23 व्या षटकात ही घटना घडली.

क्लेटनकडून चेंडू सुटल्यानंतर तो सरफराज खानच्या दिशेने गेला. पण यष्टीरक्षण करणारा सरफराज हा चेंडू रोखण्यात अयशस्वी ठरला. सरफराज खाली पडलेला चेंडू उचलण्यासाठी गेला असता रोहितने त्याच्या पाठीवर जोरदार बुक्की मारला. पण ही बुक्की त्याने रागात नाही, तर मस्करीत मारलेली होती. यानंतर दोघेही एकमेकांकडे पाहून हसताना दिसले. 

राणाच्या पुढच्याच चेंडूवर डेव्हिस शून्यावर बाद झाला. तत्पूर्वी, मुसळधार पावसामुळे पहिल्या दिवशी कोणताही खेळ होऊ न शकल्याने दोन दिवसीय सराव सामना 50 षटकांचा खेळण्यात आला.

घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध व्हाईटवॉश झाल्यानंतर बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने जबरदस्त पुनरागमन केलं. भारताने पर्थमध्ये ऑस्ट्रेलियाचा 295 धावांनी पराभव केला, पहिल्या डावात केवळ 150 धावांत गुंडाळलं असतानाही भारताने दमदार पुनरागमन केलं.

ESPNcricinfo ने शनिवारी दिलेल्या वृत्तानुसार, ऑस्ट्रेलियाचा स्टार वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या आगामी ॲडलेड कसोटीतून बाहेर पडला आहे. शॉन ॲबॉट आणि ब्रेंडन डॉगेट, जे अद्याप कसोटीत पदार्पण करू शकले नाहीत त्यांना दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियन संघात सामील करण्यात आले.

ESPNcricinfo नुसार, स्कॉट बोलँड हा डे-नाईट कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये हेझलवूडच्या जागी असेल. 6 डिसेंबरपासून या कसोटीला सुरुवात होणार आहे.