कुलदीप म्हणतो; 'आमच्यामुळे अश्विन-जडेजा टीमबाहेर नाही तर...'

कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल या दोन स्पिनरमुळे आर.अश्विन आणि जडेजा यांना मर्यादित ओव्हरमध्ये भारतीय टीममधून डच्चू मिळाला.

Updated: Mar 5, 2019, 05:44 PM IST
कुलदीप म्हणतो; 'आमच्यामुळे अश्विन-जडेजा टीमबाहेर नाही तर...' title=

नागपूर : कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल या दोन स्पिनरमुळे आर.अश्विन आणि जडेजा यांना मर्यादित ओव्हरमध्ये भारतीय टीममधून डच्चू मिळाला. पण आता रवींद्र जडेजानं भारतीय टीममध्ये तिसरा स्पिनर म्हणून पुनरागमन केलं आहे. हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त झाल्यामुळे रवींद्र जडेजाला ऑल राऊंडर म्हणून भारतीय टीममध्ये संधीही मिळत आहे. पण हार्दिक पांड्या पुन्हा एकदा टीममध्ये आला तर जडेजाचं स्थान परत धोक्यात येईल.

चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर अश्विन आणि जडेजाच्याऐवजी कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांना भारतीय टीममध्ये संधी देण्यात आली. या दोघांनी मिळालेल्या संधीचं सोनंही केलं. आणि या कारणामुळे अश्विन-जडेजाला टीमबाहेर जावं लागलं. या सगळ्यावर आता खुद्द कुलदीप यादवनं प्रतिक्रिया दिली आहे. 'आम्ही कोणत्याही खेळाडूला बाहेर केलं नाही. आम्हाला संधी मिळाली आणि आम्ही चांगलं प्रदर्शन केलं. अश्विन आणि जडेजानं भारतासाठी नेहमीच चांगली कामगिरी केली आहे. टेस्टमध्ये अजूनही अश्विन आणि जडेजा खेळत आहेत,' असं कुलदीपनं सांगितलं.

अश्विन आणि जडेजाविषयी बोलताना कुलदीप म्हणाला 'आम्हाला त्यांच्याकडून बरच शिकायला मिळालं. त्यांच्याकडे बराच अनुभव आहे. जेव्हा मी टेस्ट टीममध्ये होतो तेव्हा मला बरच शिकायला मिळालं. मला आणि चहलला जेव्हा संधी मिळाली तेव्हा आम्ही टीमसाठी प्रदर्शन केलं आणि यामुळे टीमला जिंकता आलं. यासाठी मी खुश आहे. चहल आणि जडेजा चांगले खेळत आहेत. यामुळे चिंता करण्याची गरज नाही. आम्ही प्रत्येक मॅचवर लक्ष केंद्रीत करत आहोत.'

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये कुलदीपनं चांगली बॉलिंग केली. या मॅचमध्ये कुलदीपनं २ विकेट घेतल्या. तर जडेजाला पहिल्या मॅचमध्ये एकही विकेट मिळाली नाही, पण त्यानं कमी रन दिल्या.

'कोणत्याच बॅट्समनला बॉलिंग करताना मला भीती वाटत नाही. काही खेळाडू माझ्याविरुद्ध चांगलं खेळतात, पण मी दबाव घेत नाही. शॉन मार्श स्पिन बॉलिंग चांगली खेळतो. ऑस्ट्रेलियात मार्श चांगली बॅटिंग करत होता आणि भारतीय टीम प्रशासन मला काही मॅचसाठी विश्रांती देत होतं. या कालावधीमध्ये मी मार्शची बॅटिंग बघितली. फ्रंट फूटवर खेळण्याचा मार्शला फायदा झाला. पुढच्या मॅचमध्ये मार्श खेळत असेल, तर मी त्याला कशी बॉलिंग करीन हे पाहणं महत्त्वपूर्ण असेल', असं वक्तव्य कुलदीपनं केलं.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध १२ वनडे मॅच खेळल्यानंतर त्यांच्या बॅट्समनच्या खेळण्याची पद्धत समजली असल्याचा दावा कुलदीपनं केला आहे. तसंच सहाय्यक प्रशिक्षक संजय बांगर यांच्यासोबत मी बॅटिंगवरही लक्ष केंद्रीत करायला सुरुवात केल्याचं कुलदीपनं सांगितलं. प्रत्येक सत्रामध्ये मी २० मिनिटं बॅटिंग करतो. वनडे असो किंवा टेस्ट क्रिकेट बॅटिंग करणं महत्त्वाचं आहे. रोमांचक अवस्थेत पोहोचलेल्या मॅचमध्ये बॅटिंग महत्त्वाची होऊन जाते. त्यामुळे मी संजय बांगरसोबत काम करत असल्याची माहिती कुलदीप यादवनं दिली.