WTC Final 2023 Ishan Kishan: आयपीएलनंतर लगेचच जूनमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC Final) खेळवली जाणार आहे. इंग्लंडच्या ओव्हर मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान (India vs Australia) 7 ते 14 डब्ल्यूटीसीची अंतिम फेरी खेळवली जाणार आहे. पण स्पर्धेपूर्वीच टीम इंडियाला (Team India) मोठा धक्का बसला होता. टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज आणि विकेटकीपर केएल राहुल (KL Rahul) दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला. त्याच्या जागी कोणत्या खेळाडूला संधील मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. यासाठी अनेक खेळाडूंची नावं चर्चेत होती.
अखेर बीसीसीआयने केएल राहुलच्या जागी ईशान किशनच्या (Ishan Kishan) नावाची घोषणा केली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी ईशान किशानला टीम इंडियात संधी देण्यात आली आहे. ईशान किशन सध्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) खेळतोय. आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्स संघाचं कर्णधारपद सांभाळणारा केएल राहुल डब्ल्यूटीसी स्पर्धेबरोबरच आयपीएलमधून बाहेर पडला आहे. एक मे रोजी रॉयल चॅरेंजर्स बंगलोरविरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना केएल राहुल दुखापतग्रस्त झाला. त्याच्या मांडीला गंभीर दुखापत झाली असून शस्त्रक्रिया केली जाण्याचीही शक्यता आहे.
स्टॅंडबाय खेळाडूंचीही घोषणा
बीसीसीआयने WTC अंतिम फेरीसाठी टीम इंडियातल्या स्टॅंडबाय खेळाडूंचीही घोषणा केली आहे. आयपीएलमध्ये जबरदस्त कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा यात समावेश करण्यात आला आहे. चेन्नईचा सलामीचा धडाकेबाज फलंदाज ऋतुराज गायकवाड, दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमार आणि मुंबई इंडियन्सचा मि. 360 फलंदाज अर्थात सूर्यकुमार यादवला टीम इंडियात राखीव खेळाडू म्हणून संधी देण्यात आली आहे.
जयदेव उनाडकट खेळणार
केएल राहुलबरोबरच टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटही दुखापतग्रस्त झाला आहे. गोलंदाजीचा सराव करताना उनाडकटच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलं आहे. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार जयदेव उनाडकट सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत खांद्यावर उपचार घेतोय. 7 जूनपासून सुरु होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात जयदेव उनाडकट खेळणार की नाही याबाबतचा निर्णय त्याच्या रिपोर्टसनंतर घेतला जाणार आहे.
डब्ल्यूटीसीसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनादकट, ईशान किशन (विकेटकीपर).
राखीव खेळाडू : ऋतुराज गायकवाड, मुकेश कुमार, सूर्यकुमार यादव