Cricket News : खेळाडूंना मैदानावर किंवा मैदानाबाहेर अनेक कडू गोड अनुभव येत असतात. चाहते आपल्या आवडत्या खेळाडूला भेटण्यासाठी कधी कधी सुरक्षाकवच भेदून मैदानात जातानाचं चित्र तर आपण अनेकवेळा पाहिलं आहे. आपल्या आवडत्या खेळाडूबरोबर सेल्फी (Selfie) घेण्यासाठी चाहते आतुर असतात. आपल्या आवडत्या खेळाडूचं टीशर्ट, कॅप, बूट किंवा त्याने घातलेल्या एखाद्या गोष्टीचीही मागणी करतात. काही वेळा खेळाडू चाहत्यांची मागणी पूर्णही करतात.
असे प्रकार अनेकवेळा घडत असतात, पण एका भारतीय क्रिकेटपटूबरोबर (Indian Cricketer) काहीसं वेगळंच घडलं. एका फॅन्सने टीम इंडियातल्या (Team India) एका खेळाडूकडे चक्क पैशांची मागणी केली आणि तेही गर्लफ्रेंडला (Girlfriend) डेटवर घेऊन जाण्यासाठी
काय आहे नेमका प्रकार?
टीम इंडियाचा स्पिन गोलंदाज अमित मिश्राने (Amit Mishra) नुकतंच एक ट्विट (Tweet) केलं होतं. अमित मिश्राने आपल्या ट्विटमध्ये सुरेश रैनाचं (Suresh Raina) कौतुक केलं होतं, आणि यावर अनेक कमेंटसही आल्या. पण एका कमेंटसने अमित मिश्राचं लक्ष वेधून घेतलं. या कमेंटमध्ये एका चाहत्याने अमित मिश्राकडे गर्लफ्रेंडला डेटवर घेऊन जाण्यासाठी तीनशे रुपयांची मागमी केली. विशेष म्हणजे अमित मिश्राने देखील चाहत्याची ही मागणी पूर्ण करत 500 रुपये पाठवून दिले.
रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजच्या सेमीफायनलमध्ये इंडिया लिजेंड्स संघाचा खेळाडू सुरेश रैनाने हवेत झेपावत एक कॅच पकडला. या कॅचचा व्हिडिओ अमित मिश्राने आपल्या ट्विटर अकाऊंटला शेअर करत रैनाचं कौतुक केलं होतं. याच ट्विटवर कमेंट करताना आदित्य कुमार सिंह नावाच्या एका युजर्सने अमित मिश्राकडे 300 रुपयांची मागणी केली. तसंत त्याने आपला यूपीआई आईडीही शेअर केला होता. अमित मिश्राने त्या युजर्सला 500 रुपये पाठवत त्याला मदत केली. या पोस्टचा स्क्रिनशॉट काढत अमित मिश्राने त्याला 'डेटिंगसाठी तुला शुभेच्छा' अशी प्रतिक्रियाही दिली.
Done, all the best for your date. https://t.co/KuH7afgnF8 pic.twitter.com/nkwZM4FM2u
— Amit Mishra (@MishiAmit) September 29, 2022
अमित मिश्रा क्रिकेटपासून दूर
39 वर्षीय अमित मिश्रा सध्या क्रिकेटपासून दूर आहे. आयपीएल 2022 च्या लिलावात त्याच्या कोणत्याही फ्रँचाईजीने बोली लावली नाही. गेल्या हंगामात अमित मिश्रा दिल्ली कॅपिटल्समधून खेळला आहे. अमित मिश्रा आयपीएल इतिहासातला तिसरा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. त्याने आयपीएलमध्ये 154 सामन्यात तब्बल 166 विकेट घेतल्या आहेत.