Exclusive: पत्रकार वादावर वृद्धिमान साहाची पहिली प्रतिक्रिया, सांगितली पडद्यामागची संपूर्ण कहाणी

वृद्धिमान साहाने एका पत्रकाराच्या व्हॉट्सअॅप संभाषणाचा स्क्रीनशॉट शेअर केला होता, ज्यात पत्रकाराना मुलाखतीसाठी धमकावल्याचं म्हटलं होतं.

Updated: Feb 23, 2022, 01:25 PM IST
Exclusive: पत्रकार वादावर वृद्धिमान साहाची पहिली प्रतिक्रिया, सांगितली पडद्यामागची संपूर्ण कहाणी title=

मुंबई : टीम इंडियाचा विकेटकीपर बॅट्समन वृद्धिमान साहा (Wriddhiman Saha) सध्या चांगलाच चर्चेत आहे. वृद्धिमान साहाने अलीकडेच एका पत्रकाराच्या व्हॉट्सअॅप संभाषणाचा स्क्रीनशॉट शेअर केला होता. यात पत्रकार साहाला सोशल मीडियावर मुलाखतीसाठी धमकावत असल्याचं समोर आलं होतं. 

यष्टिरक्षक फलंदाज वृद्धिमान साहाच्या या आरोपांनंतर बीसीसीआयने (BCCI) चौकशीची आदेश दिले असून कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. आता पहिल्यांदाच साहाने पत्रकार वादावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. साहाने पडद्यामागची संपूर्ण कहाणी सांगितली आहे.

पत्रकार वादावर वृद्धीमान साहाची पहिली प्रतिक्रिया
वृद्धिमान साहाने 'झी न्यूज'शी बोलताना सांगितलं की, 'पत्रकाराच्या वर्तणुकीने मी दुखावलो आहे. मी कोणत्याही पत्रकाराशी कधीही गैरवर्तन केलं नाही किंवा पत्रकारांनी कधी माझ्याशी गैरवर्तन केलं. पण या पत्रकाराचं वर्तन मर्यादे पलिकडचं होतं. मला त्याचा पर्दाफाश करायचा होता, जेणेकरून लोकांना कळेल की पत्रकारितेच्या जगातही असे काही लोक आहेत, असं वृद्धिमान साहाने म्हटलं आहे.

साहाने पत्रकाराच्या व्हॉट्सअॅप संभाषणाचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केला होता. जो त्याला मुलाखतीसाठी धमकावत होता. साहाने एक स्क्रीनशॉट शेअर केला होता, ज्यामध्ये पत्रकाराने म्हटलं होतं, 'माझ्यासोबत मुलाखत कर. ते तुझ्यासाठी चांगले ठरेल. त्यांनी (निवडकर्त्यांनी) फक्त एकच यष्टिरक्षक निवडला. पण तुम्ही 11 पत्रकारांची निवड करण्याचा प्रयत्न केला, जे योग्य नाही. सर्वात जास्त मदत करू शकेल असा एक पत्रकार निवड. पण तू फोन केला नाहीस. मी तुझी ची पुन्हा कधीही मुलाखत घेणार नाही आणि हे मी लक्षात ठेवेन.

वृद्धिमान साहाने सांगितली पडद्यामागची कहाणी
या वादावर बोलातना साहाने सांगितलं 'मला त्या पत्रकाराची ओळख उघड करायची नाही, कारण ही माझी नैतिकता आहे आणि मी तत्त्वांनुसार जगतो. मला नेहमी वाटतं की मी कोणाला तरी दुसरी संधी द्यायला हवी. या संपूर्ण वादानंतरही त्या पत्रकाराने माझ्याशी संपर्क साधला नाही किंवा माफीही मागितली नाही' असं साहाने म्हटलं आहे. 

साहा म्हणाला, 'माझ्या ट्विटनंतर बीसीसीआयने माझ्याशी ईमेल आणि फोनद्वारे संपर्क साधला आहे. ते या प्रकरणाचा तपास करत आहेत. मी त्यांना सहकार्य करेन.

द्रविड-गांगुली वादावरही प्रतिक्रिया
राहुल द्रविड, सौरव गांगुली वादावरही वृद्धीमान साहाने प्रतिक्रिया दिली आहे.  'राहुल द्रविडने (Rahul Dravid) मला थेट निवृत्तीचा विचार करण्यास सांगितलं नाही, पण संघात युवा खेळाडूंची गरज असल्याचं म्हटलं होतं. द्रविड यांनी मला सांगितलं की सध्या तू दुसऱ्या स्थानावर आहेत, आणि काही वेगळा विचार करु शकतोस, पण सध्या मी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा कोणताही विचार केलेला नाही, मी स्थानिक क्रिकेट आणि आयपीएलमध्ये खेळत राहिन असं साहा यांनी म्हटलं आहे. 

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यांमध्ये माझी कामगिरी चांगली झाली होती, त्यामुळे भारतीय संघात माझं स्थान कायम राहिल असं मला वाटत होतं, पण निवड समितीने आधीच संघ निश्चित केला होता त्यात मला संधी नव्हती असं साहाने म्हटलं आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी माझ्या खेळाचं कौतुकही केलं होतं. पण श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून मला संघातून बाहेर केल्याने मी नाराज आहे, माझं ट्विट किंवा संघातून बाहेर केल्यानंतर सौरभ गांगुली यांनी माझ्याशी संपर्क केलेला नाही, असंही साहाने म्हटलं आहे.