Team India : श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेनंतर टीम इंडियाला (Team India) मोठा ब्रेक मिळालाय. 19 सप्टेंबरपासून भारत आणि बांगालदेशदरम्यान कसोटी मालिका (India Bangladesh Test Series) खेळवली जाणार आहे. त्याआधी रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) एका स्पर्धेत आमने सामने येण्याची शक्यता आहे. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेआधी टीम इंडियाचे खेळाडू मोठी स्पर्धा खेळताना दिसणार आहे. पाच सप्टेंबरपासून दुलीप ट्रॉफी स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत टीम इंडियातले अनेक खेळाडू एकमेकांना भिडणार आहेत. दुलीप ट्रॉफीत चार संघ भाग घेतात. यात इंडिया ए, इंडिया बी, इंडिया सी आणि इंडिया डी संघांचा सहभाग असणार आहेत. यासाठी बीसीसीआयची निवड समिती लवकरच खेळाडूंची निवड करणार आहे.
स्टार खेळाडूंसाठी स्पर्धा बंधनकारक?
दुलीप ट्ऱॉफी स्पर्धेत टीम इंडियाच्या युवा खेळाडूंबरोबरच दिग्गज खेळाडूंनीही खेळावं, अशी निवड समितीची अपेक्षा आहे. यासाठी शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, यशस्वी जयस्वाल, कुलदीप यादव, अक्षर पटेल या खेळाडूंना स्पर्धेत खेळण्यास सांगण्यात आलं आहे. यातून जप्रीत बुमराहला मात्र सुट देण्यात आली आहे. जसप्रीस बुमराहला लवकर खेळवून निवड समिती कोणताही धोका पत्करु इच्छित नाही.
रोहित-विराट खेळणार स्पर्धा
दुलीप ट्ऱॉफी स्पर्धेत टीम इंडियाचे स्टार खेळाडूही खेळताना दिसणार आहेत. यात रोहित शर्मा आणि विराट कोहलीही मैदानावर उतरण्याची शक्यता आहे. असं झालं तर रोहित आणि विराट एकमेकांविरुद्ध खेळताना दिसू शकतात. मोठ्या काळानंतर रोहित आणि विराट दुलीप ट्रॉफीत खेळतील.
5 ते 25 सप्टेंबरदरम्यान दुलीप ट्रॉफी
दुलिप ट्ऱॉफी स्पर्धेची सुरुवात 5 सप्टेंबरपासून होणार आहे. 25 सप्टेंबरला स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाईल. यादरम्यान बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा होण्याची शक्यता आहे. बांगालदेश मालिकेपूर्वी खेळाडूंना सराव व्हावा या उद्देशाने टीम इंडियाचे खेळाडू दुलिप ट्रॉफीत खेळताना दिसणार आहेत.
दुलीप ट्रॉफीचं आयोजन आंध्रप्रदेशमधल्या अनंतपूर इथं होणार आहे. पण या ठिकाणी विमानतळ नाहीए. त्यामुळे टीम इंडियातले स्टार खेळाडू या स्पर्धेत खेळणार असतील तर बीसीसीआय दुलिप ट्रॉफीचे काही सामने बंगळुरुमध्ये खेळवण्याची शक्यता आहे.
भारत वि. बांगलादेश कसोटी मालिकेचं वेळापत्रक
भारत आणि बांगलादेशदरम्यान दोन कसोटी सामन्यांची कसोटी मालिका खेवळली जाणार आहे.
पहिला कसोटी सामना - 19 ते 23 सप्टेंबर - चेन्नई
दुसरा कसोटी सामना - 27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर - कानपूर