विराटची एक झलक पाहण्यासाठी 15 वर्षांच्या मुलाने केलं असं काही, तुम्ही म्हणाल हाच खरा 'जबरा फॅन'

Ind vs Ban Kanpur Test : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीचे जगभरात लाखो चाहते आहेत. विराटची एक झलक पाहण्यासाठी चाहते वाट्टेल ते करण्यासाठी तयार असतात. असाच एक जबरा चाहता कानपूरमध्ये सापडला. 

राजीव कासले | Updated: Sep 27, 2024, 07:42 PM IST
विराटची एक झलक पाहण्यासाठी 15 वर्षांच्या मुलाने केलं असं काही, तुम्ही म्हणाल हाच खरा 'जबरा फॅन' title=

Virat Kohli Fan Video : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीचे (Virat Kohli) जगभरात लाखो चाहते आहेत. विराट कोहलीची हेअरस्टाईल, विराटसारखे कपडे किंवा त्याच्यासारखी दाढी ठेवण्याची क्रेझ तरुणांमध्ये पाहायला मिळते. विराट कोहलीची एक झलक पाहण्यासाठी चाहते वाट्टेल ते करायला तयार असतात. मैदानावर तो खेळायला उतरल्यावर संपूर्ण स्टेडिअम विराटच्या नावाने दणाणून जातं. इतकंच काय तर विराटचे टॅटूही काही चाहते आपल्या अंगावर कोरुन घेतात. कानपूरमध्येही विराटचा असाच एक जबरा फॅन (Fan) सध्या चांगलाच चर्चेत आहे.

विराट कोहलीचा जबरा फॅन

कानपूरमध्ये भारत आणि बांगलादेशदरम्यान दुसरा कसोटी (Ind vs Ban 2nd Test) सामना खेळवला जात आहे. विराटची एक झलक पाहण्यासाठी 15 वर्षांच्या या फॅनने तब्बल 58 किलोमीटर सायकल चालवत कानपूर गाठलं. विराटची फलंदाजी पाहायला मिळावं अशी त्याची इच्छा होती. सोशल मीडियावर या 15 वर्षांच्या मुलाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. विराट कोहलीच्या या तरुण फॅनने उन्नावपासून कानपूर 58 किलोमीटरचं अंतर सायकलने कापलं. यासाठी त्याला तब्बल सात तास लागले.

विराटच्या फॅनचा व्हिडिओ व्हायरल

विराट कोहलीच्या या फॅनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यात त्या मुलाने आपलं नाव कार्तिकेय असल्याचं सांगितलंय. कार्तिकेयने सांगितल्यानुसार 27 सप्टेंबरला तो पहाटे 4 वाजता उन्नावमधल्या आपल्या रहात्या घरातून सायकलवरुन निघाला. सात तास सायकल चालवत त्याने सकाळी 11 वाजता कानपूरचं ग्रीन पार्क मैदान गाठलं. आई वडिलांनी तुला थांबवलं नाही का? या प्रश्नावर कार्तिकेयने एकट्याला प्रवासाला पालकांनी संमती दिल्याचं त्याने सांगितलं. कार्तिकेय दहावीत शिकतोय.

पहिल्या दिवशी इच्छा अपूर्ण

कार्तिकेयची विराट कोहलीला फलंदाजी करताना बघण्याची इच्छा कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी तरी पूर्ण झाली नाही. पहिल्या दिवशी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण पाऊस पडल्याने संपूर्ण दिवसाचा खेळ पूर्ण होऊ शकला नाही. कार्तिकेयचा व्हिडिओ पाहून सोशल मीडियावर लोकं कार्तिकेयचं कौतुक करत आहेत.

बांगलादेशच्या तीन विकेट

भारत-बांगलादेशदरम्यानच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे लवकर थांबवावा लागला. खेळ थांबल्या त्यावेळी बांगलादेशने तीन विकेट गमावत 107 धावा केल्या होत्या.