टी20 वर्ल्ड कपआधी टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, रोहित-यशस्वी ठरतायत फ्लॉप... 'या' खेळाडूला संधी मिळणार?

T20 World Cup 2024 : टी20 वर्ल्ड कपला आता 15 दिवसांचा अवधी उरला आहे. सर्व संघ तयारीला लागलेत. पण भारतीय क्रिकेट संघाचं टेन्शन वाढलंय, ज्या खेळाडूंची निवड झालीय त्यातल्या काही खेळाडूंची आयपीएलमध्ये कामगिरी घसरलीय.

राजीव कासले | Updated: May 16, 2024, 08:00 PM IST
टी20 वर्ल्ड कपआधी टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, रोहित-यशस्वी ठरतायत फ्लॉप... 'या' खेळाडूला संधी मिळणार? title=

T20 World Cup 2024 : आयपीएलच्या सतरावा हंगाम आता अंतिम टप्प्याकडे वळतोय. 26 मे रोजी आयपीएलचा (IPL 2024) अंतिम सामना खेळला जाईल, त्यानंतर  2 जूनपासून टी20 वर्ल्ड कपला सुरुवात होईल. तसं पाहिलं तर टी20 वर्ल्ड कपला 15 दिवसांचाच अवधी राहिला आहे. सर्व संघ अंतिम तयारीला लागलते. पण दुसरीकडे टीम इंडियाचं (Team India) टेन्शन वाढलं आहे. बीसीसीआयने (BCCI) 30 एप्रिलला टी20 वर्ल्ड कपसाठी 15 खेळाडूंच्या भारतीय संघाची घोषणा केली. यातले सर्व खेळाडू आयपीएलमध्ये खेळतायत. पण टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झाल्यानंतर यातल्या काही खेळाडूची कामगिरी घसरली आहे. यात रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल आणि रवींद्र जडेजासारख्या खेळाडूंचा समावेश आहे. 

2 जूनपासून टी20 वर्ल्ड कप
2 जूनपासून सुरु होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा पहिला सामना 5 जूनला खेळवला जाणार आहे. पहिल्या सामन्यात टीम इंडिया आयर्लंडविरुद्ध दोन हात करेल. पण त्याआधी टीम इंडियातले काही खेळाडू आऊट ऑफ फॉर्म झाले आहेत. यापैकी टीम इंडियाच्या दोन सलामीवीरांनी बीसीसीआयचं टेंशन वाढवलं आहे.

रोहित-यशस्वी आऊट ऑफ फॉर्म
रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jayswal) आयपीएलमधल्या गेल्या काही सामन्यात चांगली सुरुवात करुन देण्यात अपयशी ठरतायत. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सने आतापर्यंत खेळलेल्या 13 सामन्यात यशस्वी जयस्वालने 348 धावा केल्यात. यात नाबाद शतकाचाही समावेश आहे. पण बुधवारी पंजाब किंग्सविरुद्ध झालेल्या महत्त्वाच्या सामन्यात यशस्वी जयस्वाल अवघ्या 4 धावा करुन बाद झाला. त्याआधी चेन्नईविरुद्धच्या सामन्यातही यशस्वीला केवळ 24 धावा करता आल्या. तर दिल्ली विरुद्धच्या सामन्यातही तो 4 धावांवर पॅव्हेलिअमध्ये परतला. 

दुसरीकडे मुंबई इंडियन्सने खेळलेल्या 13 सामन्यात रोहित शर्माने 349 धावा केल्या आहेत. नाबाद 105 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. पण गेल्या काही सामन्यात रोहित शर्मा अपयशी ठरताना दिसतोय. कोलकाताविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात रोहित 19 धावांवर बाद झाला. तर हैदराबादविरुद्धच्या सामन्यात अवघ्या चार धावांवर त्याला समाधान मानावं लागलं. त्याआधी केकेआरविरुद्धच्या सामन्यातही रोहित 11 धावांवर बाद झाला. 

राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्सने प्रत्येकी 13 सामने खेळलेत. यापैकी मुंबई इंडियन्सचा यंदाच्या आयपीएलमधला शेवटचा सामना बाकी आहे. तर राजस्थान रॉयल्सला प्ले ऑफची संधी आहे. पण टी20 वर्ल्ड कपपूर्वी रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वालला फॉर्ममध्ये परतण्याची शेवटची संधी आहे. 

दरम्यान टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाची सलामीला पहिली पसंती रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वालच असणार आहे. पण यशस्वी पर्याय म्हणून टीम इंडिया विराट कोहलीला रोहितबरोबर सलामीला पाठवण्याचा विचार करु शकतं.