वेस्ट इंडिजकडून उधार मागितलेल्या 'शॅम्पेन'चा किस्सा तुम्हाला माहितीये?

1983 च्या वर्ल्डकपमधील एक किस्सा आता समोर आलाय तो म्हणजे विनींग शॅम्पेनचा.

Updated: Dec 26, 2021, 12:11 PM IST
वेस्ट इंडिजकडून उधार मागितलेल्या 'शॅम्पेन'चा किस्सा तुम्हाला माहितीये? title=

मुंबई : 1983 मध्ये क्रिकेट विश्वात एक अशी गोष्ट घडली ज्याचा कोणी विचारही केला नसेल. भारताने वेस्ट इंडिजसारख्या बलाढ्य टीमचा पराभव करत वर्ल्डकपवर आपलं नाव कोरलं. लॉर्डच्या बाल्कनीत हातात वर्ल्डकप धरून उभे तत्कालीन कर्णधार कपिल देव यांचा तो क्षण अजूनही अनेकांच्या डोळ्यासमोर आहे. या क्षणाने क्रिकेटला एक नवी दिशा मिळाली. 

1983च्या वर्ल्डकपवरून अभिनेता रणवीर सिंगचा 83 हा सिनेमाही नुकताच रिलीज झाला आहे. या अनेकांना माहिती नसलेले किस्से आता उघडकीस आले आहेत. असाच एक किस्सा आता समोर आलाय तो म्हणजे विनींग शॅम्पेनचा.

या सामन्यात भारताचा डाव संपला तेव्हा दोन्ही टीमचे खेळाडू ड्रेसिंग रूम अगदी निवांत मूडमध्ये होते. निकाल त्यांच्या बाजूने जाणार नाही, हे भारतीय टीमला माहीत होतं. तर वेस्ट इंडिजला खात्री होती की ते सलग तिसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन बनणार आहेत.

भारतीय ड्रेसिंग रुममध्ये कपिल देव टीमला हे पटवून देण्यात व्यस्त होते की, जर भारतीय संघ 183 धावांवर आऊट झाला तर या सर्वांनी मिळून वेस्ट इंडिजला त्यापेक्षा कमी धावा करून आऊट करू शकू. त्याच वेळी, वेस्ट इंडियन मॅनेजमेंटने उत्सवाची तयारी सुरू केली होती. त्यांनी खाण्यापिण्याची ऑर्डर दिली सोबत भरपूर शॅम्पेनच्या बाटल्या मागवल्या होत्या.

मात्र वेस्ट इंडिजचं स्वप्न भंगलं आणि भारताने त्यांचा 43 रन्सने पराभव केला. लॉर्ड्सच्या मैदानात भारतीय चाहत्यांची गर्दी होती. सर्वत्र भारताचे झेंडे फडकवले जात होते. लॉर्ड्सच्या बाल्कनीखाली एक जमाव जमला होता आणि भारतीय खेळाडूंच्या नावाचा जयघोष सुरु होता.

यानंतर मोहिंदर अमरनाथ यांच्यासह कपिल देव वेस्ट इंडिज टीमच्या ड्रेसिंग रूममध्ये गेले. तिथे त्यांनी क्लाइव्ह लॉईड आणि त्यांच्या टीमशी चर्चा केली. त्यांनी संपूर्ण टीमला भारतीय ड्रेसिंग रूममध्ये येण्याचं निमंत्रण दिलं. मात्र वेस्ट इंडिजचे खेळाडू काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. 

क्लाईव्ह लॉईड यांनी कपिल यांना आश्वासन दिलं की ते काही वेळात त्यांची टीम भेटायला येईल. त्याचवेळी कपिल यांची नजर तिथे ठेवलेल्या शॅम्पेनच्या बाटल्यांवर पडली. भारतीय ड्रेसिंग रुममध्ये अशा बाटल्या नव्हत्या. कपिल यांनी क्लाइव्ह लॉयडला विचारलं की ते शॅम्पेनच्या बाटल्या घेऊन जाऊ शकतात का. कारण त्याच्या ड्रेसिंग रूममध्ये काहीच नव्हतं. त्यावेळी लॉयडने काही न बोलता होकार दिला आणि मोहिंदर अमरनाथने बाटल्या उचलल्या.

यानंतर काही काळाने लॉयड आणि विवियन रिचर्ड टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये आले आणि खेळाडूंशी चर्चा केली.