ODI World Cup 2023: शनिवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारत विरूद्ध पाकिस्तान यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यामध्ये टीम इंडियाने पाकिस्तानच्या टीमचा 7 विकेट्सने पराभव केला. या सामन्यात टीम इंडियाने 117 बॉल्स बाकी असताना पाकिस्तानला धूळ चारली. भारताकडून झालेल्या या दारूण पराभवानंतर पाकिस्तान टीमच्या रनरेटवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे पाक टीमला सेमीफायनल गाठण्यासाठी अडचण येण्याची शक्यता आहे.
यंदाच्या वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानच्या टीमने आतापर्यंत 3 सामने खेळला आहे. या 3 सामन्यांपैकी त्यांना 2 सामन्यांमध्ये विजय मिळवणं शक्य झालं आहे. तर तिसरा म्हणजेच भारताविरूद्धचा सामना त्यांना गमवावा लागला. पाकिस्तान टीमने आतापर्यंत 2023 च्या वर्ल्डकप स्पर्धेत नेदरलँड आणि श्रीलंकेविरुद्धचे फक्त सामने जिंकले आहेत.
पाकिस्तानला भारताकडून लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागले, त्यामुळे त्याच्या नेट रनरेटचं मोठं नुकसान झालंय. पाकिस्तानला 2023 च्या वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचायचं असेल तर त्यांना एकूण 9 पैकी किमान 7 सामने जिंकावे लागणार आहे. 7 सामन्यांच्या विजयामुळे त्यांचे 14 पॉईंट्स होतील आणि त्यांना सेमीफायनलचा मार्ग मोकळा होणार आहे.
सध्याच्या परिस्थितीत पाकिस्तानचे 2 सामने जिंकून आणि एक सामना गमावल्यानंतर 4 पॉईंट्स आहेत. आता पाकिस्तान टीम वर्ल्डकपमध्ये आणखी चार सामने हरली तर त्यांचा प्रवास संपुष्टात येणार आहे. पाकिस्तान टीमला आता वर्ल्डकप 2023 मध्ये आणखी 6 सामने खेळायचे असून 4 सामने ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि इंग्लंडविरुद्ध आहेत.
वर्ल्डकप 2023 मध्ये पाकिस्तानचा सध्याचा फॉर्म पाहता, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि इंग्लंडविरुद्ध विजय नोंदवणं अशक्य वाटतंय. 2023 च्या वर्ल्डकप स्पर्धेतील एकूण 9 पैकी 5 सामन्यात पाकिस्तान टीम हरली तर त्याचा प्रवास उपांत्य फेरीपूर्वीच संपुष्टात येणार आहे. त्यामुळे एकंदरीतच पाकिस्तानच्या टीमवर वर्ल्डकप बाहेर होण्याची टांगती तलवार आहे.