Explained IPL What Is Net Run Rate: मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) संघाला इंडियन प्रिमिअर लिगमधील 63 व्या (IPL 2023 Match 63) सामन्यामध्ये लखनऊ सुपर जायंट्सच्या (LSG) संघाने पराभूत केलं. या पराभवामुळे मुंबई इंडियन्सचं क्वालिफायर-1 मध्ये खेळण्याचं स्वप्न तर भंग पावलं पण त्याचबरोबर प्लेऑफ्समध्ये पात्र ठरण्याची वाट अधिक बिकट झाली आहे. आता मुंबईला हैदराबाद सनरायझर्सविरुद्धचा (MI vs SHR) सामना केवळ जिंकून फायदा होणार नाही तर इतर संघांपेक्षा वरचढ राहण्यासाठी मुंबईला हा सामना मोठ्या फरकाने जिंकून आपला नेट रन रेट पॉझिटीव्ह राहील हे सुद्ध पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. गुजरात टायन्सचा संघ आधिक प्लेऑफ्ससाठी क्वॉलिफाय झाल्याने उरलेल्या 3 जागांसाठी 6 संघांमध्ये चुरस असल्याने नेट रन रेटला फार महत्त्वं प्राप्त झालं आहे. पण नेट रन रेट म्हणजे नेमकं काय आणि ते कसं मोजलं जातं हे अनेकांना ठाऊक नसतं. मुंबई यंदाच्या आयपीएल स्पर्धेत पुढील फेरीत जाणार की स्पर्धेतून बाहेर पडणार हे ज्या नेट रन रेटवर अवलंबून आहे ते नेमकं काय असतं आणि कसा त्याच्या हिशेब लावतात हे आज आपण जाणून घेऊयात...
नेट रन रेट नेहमी पॉइण्ट्स टेबलमध्ये सर्वात उजव्या बाजूला दाखवलं जातं. नेट रन रेटचा शॉर्टकट म्हणजेच एनआरआर असं लिहून त्याखाली आकडे दिलेले असतात. नेट रन रेट हे निगेटीव्ह म्हणजे उणे आणि पॉझिटीव्ह असते. सामान्यपणे 3 किंवा त्याहून अधिक संघ खेळत असलेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पुढील फेरीसाठी संघांना पात्र ठरवण्यासंदर्भातील निर्देशक म्हणून नेट रन रेटचा वापर करण्यात येतो. मागील अनेक दशकांपासून ही पद्धत वापरली जात असून याच आधारावर संघ स्पर्धेत पुढे जाणार की स्पर्धेतून बाहेर पडणार हे ठरतं. आयपीएलबरोबरच जगभरात खेळवल्या जाणाऱ्या टी-20 लीग, वर्ल्डकपचे सामने किंवा वर्ल्ड टेस्ट सिरीजसारख्या स्पर्धांमध्ये या नेट रन रेट फार महत्त्वाचं ठरतं. याबद्दल अनेक क्रिकेटप्रेमी बातम्यांमध्ये वाचतात मात्र नेट रन रेट म्हणजे नेमकं काय हे अनेकांना कळत नाही. तसं याचं गणित अगदी साधं आणि सरळ असतं. ते नेमकं कसं हे पाहूयात पण त्याआधी सध्याचं म्हणजेच 63 व्या सामन्यानंतरचं आयपीएलचं पॉइण्ट्स टेबल कसं आहे यावर नजर टाकूयात...
गुजरात सध्या नेट रन रेट बरोबरचं गुणांनुसारही पहिल्या स्थानी असून हा संघ प्लेऑफ्ससाठी क्वालिफाय झाला आहे. 13 सामन्यांमध्ये 9 विजयांसहीत 18 गुणांबरोबर +0.835 नेट रन रेट असणारा हा संघ आयपीएल 2022 चा विजेता संघ आहे.
त्या खालोखाल चेन्नईचा क्रमांक असून त्यांचं नेट रन रेट+0.381 इतकं आहे. त्यांच्या नावावर 15 गुण आहेत. त्या खालोखाल पॉझिटिव्ह नेट रन रेट असलेला संघ आहे लखनऊ सुपर जायंट्स. लखनऊचा नेट रन रेट +0.304 इतका आहे. लखनऊच्या नावावरही 15 गुण आहेत. मुंबईच्या संघाने 7 सामने जिंकल्याने पॉइण्ट्समुळे ते निगेटीव्ह रन रेट असूनही चौथ्या स्थानी आहेत. मुंबईचा नेट रन रेट -0.128 इतका आहे. मुंबईच्या नावावर 14 गुण आहेत. मुंबई खालोखाल 12 गुणांसहीत आरसीबीचा संघ आहे. मात्र त्यांचे 2 सामने शिल्लक आहेत. तसेच आरसीबीचा नेट रन रेट पॉझिटिव्ह आहे. आरसीबीचा नेट रन रेट +0.166 इतका आहे. त्याचबरोबर 12 गुणांसहीत राजस्थानचा संघही +0.140 नेट रन रेटसहीत प्ले ऑफच्या स्पर्धेत कायम आहे. त्याचप्रमाणे प्रत्येकी 12 गुणांसहीत केकेआर आणि पंजाबचा संघही प्ले ऑफच्या शर्यतीत कायम आहेत. मात्र त्यांचा नेट रन रेट हा मुंबईपेक्षाही सुमार आहे. केकेआरचा नेट रन रेट -0.256 तर पंजाबचा नेट रन रेट -0.268 इतका आहे.
कोणत्याही संघाचा नेट रन रेट हा त्या संघाने संपूर्ण स्पर्धेत केलेल्या कामगिरीचा विचार करुन ठरतो. नेट रन रेटला अगदी सोप्या भाषेत निव्वळ धावगतीचा दर असं म्हणता येईल. एखाद्या संघाने स्पर्धा खेळताना केलेल्या एकूण धावा आणि त्यांनी खेळलेल्या ओव्हर्सच्या मदतीने त्यांनी एका ओव्हरमध्ये किती धावा केल्या याची सरासरी काढली जाते. तसेच याच संघाविरुद्ध खेळणाऱ्या संघांनी त्यांच्याविरुद्ध फलंदाजी करताना एका ओव्हरमध्ये किती धावा केल्या याची सरासरीही काढली जाते. यानंतर संघाच्या पर ओव्हर एव्हरेज स्कोअरमधून त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांनी केलेला पर ओव्हर एव्हरेस स्कोअर वजा करुन जी आकडेवारी मिळते त्याला नेट रन रेट म्हणतात.
एखाद्या सामन्यामध्ये सर्व ओव्हर फलंदाजी न करताच संघ ऑल आऊट झाला तरी नेट रन रेटचा हिशोब लावताना संपूर्ण ओव्हर्सचाच विचार केला जातो. अगदी साध्या भाषेत सांगायचं झालं तर 20 ओव्हरच्या सामन्यामध्ये एखादा संघ 13 व्या ओव्हरलाच ऑलाऊट झाला तरी ते पूर्ण 20 ओव्हर खेळले असेच मानले जाते. संघाने किती ओव्हर बॅटिंग केली किंवा प्रतिस्पर्धी संघाने अधिक ओव्हर फलंदाजी केली यासारख्या गोष्टी गृहित धरत नाहीत.
ज्या सामन्यांचा निकाल लागला त्यांचाच विचार नेट रन रेटसाठी केला जातो. म्हणजेच जे सामने रद्द झाले किंवा अर्धवट खेळून पावसामुळे वगैरे सोडून द्यावे लागले त्यांचा विचार नेट रन रेट काढताना केला जात नाही. आता तुम्हाला प्रश्न पडेल की मग या सामन्यांचे गुण वाटून दिले जातात त्याचं काय? तर गुण वाटून दिलेले सामने नेट रन रेटच्या हिशेबात पकडले जात नाहीत.