वर्ल्डकप स्पर्धेत एकीकडे भारतीय संघ जबरदस्त कामगिरी करत असताना काही खेळाडूंनी आपली छाप पाडली आहे. यामधील सर्वाधिक चर्चा भारतीय गोलंदाज मोहम्मद शमीची आहे. स्पर्धा सुरु झाल्यानंतर प्लेईंग 11 मध्ये संधी न मिळालेल्या मोहम्मद शमीला पाचव्या सामन्यात अखेर संधी मिळाली. यानंतर त्याने संधीचं सोनं करत न्यझीलंडविरोधातील सामन्यात 5 विकेट्स घेतल्या. यानंतर झालेल्या इंग्लंडविरोधात झालेल्या सामन्यातही त्याने 4 विकेट्स घेतल्या. वर्ल्डकपमध्ये खेळेल्या फक्त दोन सामन्यात मोहम्मद शमीने 9 विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत.
इंग्लंड संघाचा माजी गोलंदाज स्टीव्ह हार्मिसन याने मोहम्मद शमीचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. यावेळी त्याने मोहम्मद शमी हा जसप्रीत बुमराह नसल्याने तो सर्वात कमी दर्जा मिळालेल्यांपैकी आहे असं म्हटलं आहे.
"मोहम्मद शमी जसप्रीत बुमराह नसल्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याला योग्य तो दर्जा मिळालेला नाही. हरिस रौफचीदेखील हीच स्थिती आहे, जेल्हा शाहीन आफ्रिदीचा उल्लेख होतो. ऑफ स्टंपवरून चेंडूची दिशा बदलण्याची शमीची क्षमता या दोघांना पूर्णपणे भिन्न बनवते", असं स्टीव्ह हार्मिसन याने ESPNcricinfo शी संवाद साधताना सांगितलं.
दरम्यान स्टीव्ह हार्मिसन याने जसप्रीत बुमराहचंही कौतुक केलं आहे. सध्या बुमराह सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. बुमराहने 6 सामन्यात 14 विकेट्स घेतल्या आहेत.
"जसप्रीत बुमराह आघाडीच्या फलंदाजांसाठी अनेक समस्या निर्माण करत आहे. जे इतरांना जमत नाही. ऑस्ट्रेलिया संघ चांगला खेळत असताना मिशेल स्टार्क आणि इतरांनी चांगली खेळी केली. पाकिस्तानसाठी शाहीन आफ्रिदीही तेच करत आहे. पण मला वाटतं बुमराह भारतीय संघासाठी फार महत्त्वाचा आहे. तो योग्य लांबीवर चेंडू टाकत फलंदाजाला नेमका कुठे जाईल याबाबत संभ्रमित करतो," असं कौतुक स्टीव्ह हार्मिसन याने केलं आहे.
भारतीय संघ आता पुढील सामन्यात श्रीलंकेशी भिडणार आहे. मुंबईतील वानखेडे मैदानात हा सामना होणार आहे. सर्वच्या सर्व 6 सामने जिंकत भारतीय संघ सध्या पहिल्या क्रमांकावर आहे.