IPL 2019 : पुजारा नसल्याची कुंबळेला खंत

आयपीएलच्या १२व्या मोसमाला मोठ्या दिमाखात सुरुवात झाली आहे.

Updated: Mar 28, 2019, 08:21 PM IST
IPL 2019 : पुजारा नसल्याची कुंबळेला खंत

मुंबई : आयपीएलच्या १२व्या मोसमाला मोठ्या दिमाखात सुरुवात झाली आहे. पण भारताच्या टेस्ट टीमचा हिरो चेतेश्वर पुजारा आयपीएलमधल्या या झगमगाटापासून गायब आहे. लिलावावेळी कोणत्याच टीमने पुजाराला विकत घेतलं नाही. भारताचा माजी क्रिकेटपटू आणि टेस्टमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेणाऱ्या अनिल कुंबळेने मात्र पुजारा आयपीएलमध्ये नसल्याची खंत व्यक्त केली आहे. आयपीएलमध्ये पुजारा आणि इशांत शर्मा यांच्याकडे चांगली कामगिरी करण्याची क्षमता आहे, असं कुंबळेला वाटतं. मागच्या मोसमात इशांत शर्माला कोणत्याच टीमने विकत घेतलं नव्हतं, तर या मोसमात दिल्लीने इशांतला संधी दिली आहे. 

अनिल कुंबळे आयपीएलचे अधिकृत प्रसारण करणाऱ्या स्टार स्पोर्ट्सचा कार्यक्रम 'डगआऊट'मध्ये म्हणाला 'इशांत शर्माकडे कौशल्य आणि आत्मविश्वास दोन्ही आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये त्याने चांगली कामगिरी केली आहे आणि त्याला आयपीएलमध्ये खेळायचा अधिकार आहे. काही खेळाडूंना संधी मिळत नाही हे दूर्भाग्य आहे.'

'इशांत आणि पुजाराप्रमाणेच जे खेळाडू भारतासाठी टेस्ट खेळत आहेत, त्यांनी टी-२० क्रिकेटचा हिस्सा असायला हवं. इशांत शर्माला अखेर संधी मिळाली याचा मला आनंद आहे. इशांत चांगली कामगिरी करत आहे', अशी प्रतिक्रिया कुंबळेने दिली.

अनिल कुंबळेने आयपीएलमधल्या युवा खेळाडूंच्या कामगिरीचंही कौतुक केलं आहे. 'युवा खेळाडू हे निडर आहेत. पृथ्वी शॉ, ऋषभ पंतने मुंबईविरुद्ध जबरदस्त खेळ केला. अशाप्रकारची प्रतिभा बघणं अद्भूत असतं', असं वक्तव्य कुंबळेने केलं.