नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट टीम न्यूझीलंड दौऱ्यावर दाखल झाली आहे. या दौऱ्यात भारतीय टीम एकूण १० मॅच खेळणार आहे. यामध्ये ५ टी-२०, ३ वनडे आणि २ टेस्ट मॅचचा समावेश आहे. २४ जानेवारीपासून टी-२० सीरिजला सुरुवात होईल. या सीरिजसाठी भारतीय टीम विकेट कीपर म्हणून ऋषभ पंतला घेऊन गेली आहे, पण पंतला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये पंतला दुखापत झाली होती, यानंतर केएल राहुलने विकेट कीपिंग केली होती. राहुलने विकेट कीपर आणि बॅट्समन म्हणूनही उल्लेखनीय कामगिरी केली होती. विराट कोहलीनेही न्यूझीलंडमध्ये राहुल विकेट कीपिंग करेल असे संकेत दिले. २००३ साली राहुल द्रविडने विकेट कीपिंगही केली होती. केएल राहुलही द्रविडसारखंच संतुलन टीमला देतो, असं विराटने सांगितलं.
विराट कोहलीच्या या वक्तव्यामुळे ऋषभ पंतचं भवितव्य काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याने याबाबत त्याचं मत मांडलं आहे.
'केएल राहुल उत्कृष्ट खेळाडू आहे. त्याचा फिटनेसही चांगला आहे, तसंच त्याच्याकडे नेतृत्व गूण आहेत. राहुल भारतासाठी चांगली भूमिका बजावू शकतो. टीम प्रशासन आणि निवड समितीने राहुलसोबत विकेट कीपिंग आणि बॅटिंग या दोन्ही भूमिकांबाबत चर्चा केली आहे का? राहुलने विकेट कीपिंग करण्यासाठी स्वत: मनाने तयार झाला आहे का? बहुतेकवेळा युवा खेळाडू कोणत्याच गोष्टीला नाही म्हणत नाहीत,' असं गंभीर म्हणाला.
'गेल्या काही दिवसांमध्ये ऋषभ पंतचा आत्मविश्वास डळमळीत झाला आहे. त्याच्या तंत्रावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तो या सगळ्या गोष्टी कशा घेईल हे मला माहिती नाही. जर ऋषभ पंतसोबत खुल्या मनाने बातचित केली गेली तर ते टीमसाठी चांगलं असेल,' अशी प्रतिक्रिया गंभीरने दिली.