आयसीसीच्या पुरस्कारांवर भारतीयांचा ठसा, या खेळाडूंचा सन्मान

आयसीसीकडून २०१९ सालच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. 

Updated: Jan 15, 2020, 12:51 PM IST
आयसीसीच्या पुरस्कारांवर भारतीयांचा ठसा, या खेळाडूंचा सन्मान title=

दुबई : आयसीसीकडून २०१९ सालच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. २०१९ या वर्षात क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची नावं आयसीसीने जाहीर केली आहेत. विराट कोहलीला स्पिरीट ऑफ क्रिकेट पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.

वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमध्ये प्रेक्षकांनी स्टीव्ह स्मिथला चिडवलं होतं. यावेळी कोहलीने स्मिथला चिडवू नका, तर त्याच्यासाठी टाळ्या वाजवा, असं सांगितलं. या वागणुकीबद्दल विराटचा सन्मान करण्यात आला. याचबरोबर विराटची आयसीसीच्या टेस्ट टीममध्येही निवड करण्यात आली आहे. विराटसोबत मयंक अग्रवाललाही आयसीसीच्या सर्वोत्तम टेस्ट टीममध्ये संधी देण्यात आली आहे.

दुसरीकडे एका वर्ल्ड कपमध्ये ५ शतकं करण्याचा विक्रम करणाऱ्या रोहित शर्माची 'वनडे क्रिकेटर ऑफ द इयर' म्हणून निवड करण्यात आली आहे. रोहितने २०१९ या वर्षात वनडेमध्ये एकूण ७ शतकं केली. पॅट कमिन्सची 'टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर' म्हणून घोषणा झाली आहे.

दीपक चहरने बांगलादेशविरुद्धच्या टी-२०मध्ये ७ रन देऊन ६ विकेट घेतल्या. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधली ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. याच कामगिरीचा गौरव आयसीसीनेही केला आहे. दीपक चहरचा हा स्पेल २०१९ मधला टी-२० क्रिकेटमधला सर्वोत्तम स्पेल असल्याचं आयसीसीने घोषित केलं.

वर्ल्ड कपमधली उल्लेखनीय कामगिरी आणि ऍशेसमध्ये ऐतिहासिक शतक करुन इंग्लंडला मॅच जिंकवणाऱ्या बेन स्टोक्सला 'गारफिल्ड सोबर्स क्रिकेटर ऑफ द इयर' हा सन्मान देण्यात आला आहे.

मार्नस लॅबुशेनला उदयोन्मुख क्रिकेटपटूच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. आयसीसीने रिचर्ड एलिंगवर्थ यांची अंपायर ऑफ द इयर म्हणून घोषणा केली आहे.

आयसीसी टेस्ट टीम 

मयंक अग्रवाल, टॉम लेथम, मार्नस लॅबुशेन, विराट कोहली (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, बेन स्टोक्स, बीजे वॉटलिंग, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, निल वॅगनर, नॅथन लायन