विराट, रोहितला खराब कामगिरीचा फटका, हा खेळाडू ICC T20 Rankings मध्ये 'नंबर वन'

टी20 विश्वचषकात खराब कामगिरीचा फटका भारतीय खेळाडूंना बसला आहे

Updated: Nov 3, 2021, 05:59 PM IST
विराट, रोहितला खराब कामगिरीचा फटका, हा खेळाडू ICC T20 Rankings मध्ये 'नंबर वन' title=

ICC T20 Rankings: आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊंसिलने (ICC) आंतरराष्ट्रीय टी20 (T20 International) फलंदाजांची नवीन क्रमवारी (Batsman Ranking) जाहीर केली आहे. या क्रमवारीत मोठे फेरबदल पाहिला मिळत आहेत. यूएईमध्ये (UAE) सुरु असलेल्या टी20 विश्वचषकात स्पर्धेत तीन अर्धशतकं करणारा पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने (Babar Azam) थेट पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. इंग्लंडचा फलंदाज डेव्हिड मलानला बाबर आजमने मागे टाकलं आहे. (Babar Azam Overtakes Dawid Malan To Become Top-Ranked Batter)

क्रिकेटमध्ये 'बाबर' युग

टी20 विश्वचषकात बाबर आझमच्या नेतृत्वात खेळणाऱ्या पाकिस्तान संघाने सलग चार सामने जिंकत सेमीफायनलमध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. त्यातच आता बाबर आझमने टी20 क्रमवारीत पहिलं स्थान मिळवल्याने पाकिस्तान क्रिकेटमध्ये आनंदाचं वातवरण आहे. बाबर आझमने 124.52च्या स्ट्राईक रेटने 66 च्या सरासरीने 198 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे बाबर आझम एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीतही पहिल्या स्थानावर आहे.

भारतीय खेळाडूंना फटका

टी20 विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाच्या खराब कामगिरीचा फटका खेळाडूंच्या क्रमवारीवरही झाला आहे. टी20 फलंदाजांच्या क्रमवारीत भारताच्या केवळ दोन खेळाडूंचा समावेश आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली पाचव्या स्थानावर तर रोहित शर्मा आठव्या स्थानावर आहे. 

श्रीलंकन गोलंदाज अव्वल स्थानावर

दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात प्रत्येकी तीन विकेट घेणारा श्रीलंकेचा लेग स्पीन गोलंदाज वानिंदु हसरंगा आपल्या क्रिकेट कारकिर्दीत पहिल्यांदाच सर्वोच्च स्थानावर पोहचला आहे. टी20 गोलंदाजांच्या क्रमवारीत हसरंगाने अव्वल स्थान पटकावलं आहे. हसरंगाने दक्षिण आफ्रिकेच्या तबरेज शम्सीला मागे ढकललं आहे. 

गोलंदाजांच्या क्रमवारीत हसरंगा आणि शम्सीनंतर तिसऱ्या क्रमांकावर इंग्लंडचा आदिल राशिद आणि चौथ्या क्रमांकावर अफगाणिस्तानच्या राशिद खान यांचा क्रमांक लागतो. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एनरिक नोर्कियाने 18 व्या स्थानावरुन थेट सातव्या स्थानावर झेप घेतली आहे.

अष्टपैलू खेळाडूंमध्ये नबी अव्वल

अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी आणि बांगलादेशचा शाकिब अल हसन दोघंही समान अंकांसह पहिल्या स्थानावर आहेत.