नवी दिल्ली : २०१९ साली इंग्लंडमध्ये होणाऱ्या क्रिकेट वर्ल्ड कपला ४०० दिवस बाकी आहेत. आयसीसीनं या वर्ल्ड कपचं वेळापत्रक काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध केलं होतं. ५ जूनला भारत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिली मॅच खेळेल. पण क्रिकेट फॅन्सना सर्वाधिक उत्सुकता आहे ती भारत आणि पाकिस्तानच्या सामन्याची. गेल्या अनेक वर्षांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये सीरिज झालेली नाही. या दोन्ही टीम फक्त आयसीसीच्याच स्पर्धांमध्ये एकमेकांविरुद्ध क्रिकेट खेळतात. वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तानची मॅच १६ जूनला मॅन्चेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्डमध्ये खेळवण्यात येणार आहे. पाकिस्ताननं भारताला आत्तापर्यंत एकदेही वर्ल्ड कप मॅचमध्ये हरवलेलं नाही.
आयसीसीनं मॅचची तारीख, मैदान आणि तिकीटांचे दरही घोषित केले आहेत. आयसीसीनं दिलेल्या माहितीनुसार वर्ल्ड कपची ८० हजार तिकिटांची किंमत २० पाऊंड आणि २ लाख तिकीटं ५० पाऊंडपर्यंत असणार आहेत.
वर्ल्ड कपमधल्या प्रत्येक मॅचनुसार तिकीटांचे दर असणार आहेत. बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधल्या मॅचचं तिकीट ४० पाऊंडांपेक्षा कमी किंमतीत मिळणार आहे. पण मोठ्या मॅचसाठी तिकीटांचे दर ५५ ते ७० पाऊंडपर्यंत असतील. काही मॅचचे दर १०० पाऊंडपेक्षाही जास्त असू शकतात.
भारत आणि पाकिस्तानमधल्या मॅचचे तिकीट दर चार श्रेणींमध्ये ठेवण्यात आले आहेत. प्लॅटिनम, गोल्ड सिल्व्हर आणि ब्रॉन्ज अशा श्रेणींमध्ये तिकीटाची विभागणी करण्यात आली आहे. प्लॅटिनम तिकीटाची किंमत २३५ पाऊंड(२१,८३३रुपये), ब्रॉन्ज श्रेणीतलं तिकीट ७० पाऊंड(६,५०३ रुपये) ठेवण्यात आलंय. लहान मुलांसाठीच्या तिकीटाची किंमत आणखी कमी असणार आहे. गोल्ड श्रेणीमध्ये लहान मुलांचं तिकीट ३० पाऊंड(२७८७ रुपये) ठेवण्यात आलंय.
२०१९ वर्ल्ड कपच्या फायनलचं तिकीट ३९५ पाऊंड(३६,६८८रुपये) आणि ९५ पाऊंड(८८२३ रुपये) असणार आहे.
वर्ल्ड कपच्या तिकीटांची विक्री ८ मे ते १ जूनपर्यंत होणार आहे. आयसीसीच्या वेबसाईटवर ही तिकीट उपलब्ध होतील. तिकीट विकत घेण्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवर रजिस्टर करावं लागणार आहे. रजिस्टर केल्यावरही तिकीट मिळालं नाही तर जुलैमध्ये पुन्हा तिकीट विकत घ्यायची संधी आहे. ही संधी हुकली तर सप्टेंबरमध्ये पहिले येणाऱ्यास प्राधान्यानुसार तिकीट देण्यात येईल.