ICC Cricket World Cup 2023: क्रिकेटचा कुंभमेळा अर्थात आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचं बिगुल वाजलंय. आतापर्यंत दोन सामने खेळवण्यात आले असून पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडचा धुव्वा उडवला. तर दुसऱ्या सामन्यात नवख्या नेदरलँडसमोर पाकिस्तानला रडत-खडत विजय मिळवता आला. आता करोडो भारतीय क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे ते टीम इंडियाच्या (Team India) सामन्याकडे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाच्या मिशन वर्ल्ड कपची आज सुरुवात होतेय. भारताचा सलामीचा सामना बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी (India vs Australia) आहे. चेन्नईच्या चिदम्बरम स्टेडिअमवर हा सामना रंगतोय.
टॉस कोणी जिंकला
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिंस आणि भारताचा कर्णधार रोहित शर्मा टॉससाठी मैदानात उतरले. पॅट कमिंस टॉस का बॉस ठरला. टॉस जिंकत ऑस्ट्रेलियाने पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. भारत पहिली गोलंदाजी करणार आहे. शुभमन गिल पहिला सामना खेळणार नाही. त्याच्याऐवजी ईशान किशनला संधी देण्यात आली आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताची प्लेईंग इलेव्हन
रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.
भारत वि. ऑस्ट्रेलिया
भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांचा विश्वचषक स्पर्धा 2023 मधील हा पहिलाच सामना असून जगभरातील क्रिकेट चाहत्यांचं लक्ष या सामन्याकडे लागलंय. कारण यंदाच्या विश्वचषक जेतेपदासाठी हे दोन्ही संघ प्रबळ दावेदार मानले जातायत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सेमीफायनलसाठी निवडलेल्या चार संघातही भारत आणि ऑस्ट्रेलियाला स्थान देण्या आलं आहे. त्यामुळे विश्वचषक स्पर्धेत विजयी सलामी देण्यासाठी हे दोन्ही संघ उत्सुक आहेत.
टीम इंडियाला मोठा धक्का
विश्वचषकातील पहिल्य सामन्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली असली तरी सामन्यापूर्वीच टीम इंजियाला मोठा धक्का बसला आहे. जबरदस्त फॉर्मात असलेला टीम इंडियाचा सलामीवीर शुभमन गिल पहिला सामना खेळणार नाहीए. शुभमन गिलला डेंग्यूची लागण झाली आहे. त्यामुळे तो सराव सामन्यालाही उतरु शकला नाही.
भारत ऑस्ट्रेलिया एकदिवसीय कामगिरी
भारत आणि ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट इतिहास फार जुना आहे. दोनही संघांमध्ये 1980 पासून 2023 पासून तब्बल 149 एकदिवसीय सामने खेळवण्यात आले आहेत. आकडेवारी पाहिली तर ऑस्ट्रेशलियाचं पारडं जड आहे. 149 सामन्यांपैकी ऑस्ट्रेलियाने तब्बल 83 सामने जिंकले आहेत. तर भारताला आतापर्यंत केवळ 56 सामन्यात विजय मिळवता आला आहे. दहा सामन्यांचा निकाल लागला नाही. विशेष म्हणजे या भारत आणि ऑस्ट्रेलियात आतापर्यंत एकही सामना टाय झालेला नाही.
विश्चचषक स्पर्धेचा इतिहास पाहिला तर भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान आतापर्यंत 12 सामने खेळवण्यात आले आहेत. यात ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक 8 सामने जिंकलेत. तर भारताने केवळ चार सामन्यात विजय मिळवलाय. चेन्नईच्या चिदम्बरम मैदानावर आतापर्यंत खेळल्या गेल्या तीन सामन्यात भारताच्या बाजूने 1 तर ऑस्ट्रेलियाच्या बाजूने दोन सामन्यांचा निकाल लागला आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या आतापर्यंतच्या एकदिवसीय क्रिकेटमधल्या कामगिरीवर लक्ष टाकलं तर ऑस्ट्रेलियाचं पारडं जड आहे. पण हे चित्र बदलवण्यासाठी रोहितसेना सज्ज झालीय.