क्रिकेट समीक्षक रवि पत्की मुंबई: इंग्लंडमधील लीड्स येथील हेडींग्लि मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना उद्यापासून सुरू होत आहे. लॉर्ड्स वरील अविस्मरणीय विजयाने भारताचा संघ चांगलाच जोमात आहे. लीड्सला ढगाळ हवामान आणि कोकणातील भातशेतीसारखी हिरवीगार खेळपट्टी ही वैशिट्ये आहेत. 2002 साली अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत द्रविड आणि तेंडुलकरने शतके करून भारताला विजयी केले होते. त्या सामन्यानंतर भारत लीड्सला कसोटी खेळलेला नाही.
भारताने एक-शून्य अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या दोन्ही कसोटीत भारताच्या सलामीच्या जोडीने वरच्या दर्जाची कामगिरी करून चांगल्या धावसंख्येची मुहूर्तमेढ रचली. कोहलीला पुन्हा ऑफ स्टंप त्रास देतो आहे. क्रिकेटमध्ये फक्त middle आणि लेग एवढे दोनच स्टंप असते तर बरं झालं असतं असं कोहलीला वाटलं असेल तर त्यात त्याची काही चूक नाही. पुजारा आणि रहाणेच्या फॉर्मचा प्रश्न नसतो तर त्यांच्या दरवेळेस आऊट होण्याची पद्धत प्रश्न निर्माण करते. पुजाराचा 300 चेंडूत का होईना पण एक शंभर दूर नाही असे वाटते.
भारताच्या तळाच्या बॅट्समननी मागच्या कसोटीत भारताला जिंकून देणारे योगदान दिले. पण आपण ही गोष्ट विसरायची नाही की त्यांनी चेंडूच्या मागे येऊन बॅटिंग केली नाही. त्यांनी बॅट फिरवली होती आणि तो दिवस त्यांचा होता. त्यातल्या काही धावा त्यांनी केल्या होत्या आणि बऱ्याचशा धावा 'झाल्या' होत्या. त्यामुळे शमी, बुमराह, सिराज, इशांत यांच्या कडून दरवेळेस मोठी अपेक्षा करणे चूकच आणि ते बॅटिंग मध्ये अयशस्वी झाले तर त्यांना वेठीस धरणे चूक.
शमी आणि बुमराहला जी अनाकलनीय फिल्डिंग लावली होती ती चूक रूट पुन्हा करणार नाही.तळाच्या बॅट्समनला सहा फिल्डर्स बाउंडरी वर ठेऊन रूटने काय मिळवले असेल तर इंग्लंडच्या मीडियाचे जोडे. इंग्लंड मीडिया सध्या इंग्लंड संघावर दात ओठ खाऊन आहे. दुसऱ्या कसोटीच्या पाचव्या दिवशी सर्व इंग्लंड मीडिया जिंकायच्या तयारीने आला होता.पण त्यांच्या सगळ्या बिअर भारतीयांनी पळवल्या आणि त्यामुळे इंग्लंड मीडिया नसलेल्या बिअरसागरात शोक करत बुडाला.
अजून एक गोष्ट आपण विसरता कामा नये म्हणजे इंग्लंडचा संघ घरच्या कंडिशन्स मध्ये खेळत आहे. त्यामुळे ते कितीही अयशस्वी होत असले तरी त्यांचे ग्रह बदलू शकतात.तसेच गेल्या काही वर्षांत क्रिकेट मध्ये असंख्य अनपेक्षित निकाल लागत आहेत.त्या पार्श्वभूमीवर कुठल्याही संघाला रिजेक्ट करणे फार धोकादायक आहे.
भारतीय संघ मानसिक रित्या चांगलाच तयार असणार आहे.पण उरलेले तीन सामने भारत एकतर्फी जिंकेल हे म्हणजे करोना काळात पर्यटन क्षेत्राची भरभराट झाली ह्या वाक्याइतके हास्यास्पद होईल. उत्तम लढाईसाठी तयार राहूया. दोन्ही संघाला शुभेच्छा.