टेस्ट सीरिजआधी टेलर म्हणतो, 'बुमराह नाही तर हा बॉलर धोकादायक'

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या टेस्ट सीरिजला शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे.

Updated: Feb 19, 2020, 04:01 PM IST
टेस्ट सीरिजआधी टेलर म्हणतो, 'बुमराह नाही तर हा बॉलर धोकादायक'

वेलिंग्टन : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या टेस्ट सीरिजला शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे. वेलिंग्टनच्या मैदानामध्ये हा सामना रंगेल. या दौऱ्यामध्ये भारताने टी-२० सीरिज ५-०ने जिंकल्यानंतर किवींनी जोरदार पुनरागमन केलं. वनडे सीरिजमध्ये न्यूझीलंडचा ३-०ने विजय झाला. यानंतर आता २ टेस्ट मॅचची सीरिज होणार आहे. या सीरिजची पहिली टेस्ट मॅच रॉस टेलरची १००वी टेस्ट असेल. १०० टेस्ट, १०० पेक्षा जास्त वनडे आणि १०० पेक्षा जास्त टी-२० आंतरराष्ट्रीय मॅच खेळणारा टेलर हा जगातला पहिला खेळाडू ठरणार आहे.

टेस्ट मॅचआधी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये टेलरने बुमराह नाही तर इशांत शर्मा जास्त धोकादायक आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. बुमराहने वनडे सीरिजमध्ये निराशाजनक कामगिरी केली. तिन्ही मॅचमध्ये बुमराहला एकही विकेट घेता आली नव्हती. यामुळे बुमराहला वनडे क्रिकेट क्रमवारीमधला त्याचा पहिला क्रमांक गमवावा लागला होता. तरीही न्यूझीलंडची टीम बुमराहला कमी लेखत नाहीये.

'आम्ही फक्त बुमराहवर लक्ष दिलं तर अडचणी वाढू शकतात. भारताची सगळी बॉलिंग जबरदस्त आहे. इशांत शर्माच्या पुनरागमनामुळे टीमचं आक्रमण धारदार झालं आहे,' असं टेलर म्हणाला.

टेलरने भारताच्या बॅटिंगचंही कौतुक केलं आहे. 'भारताचे बॅट्समन जगातले सर्वोत्तम आहेत. आम्हाला सर्वोत्कृष्ट खेळ दाखवावा लागेल,' अशी प्रतिक्रिया टेलरने दिली.