केपटाऊन : टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा आणि निर्णायक (IND vs SA 3Rd Test) कसोटी सामना 11 जानेवारीपासून केपटाऊनमध्ये खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात नियमित कर्णधार विराट कोहली कमबॅक करणार आहे. त्यामुळे विराटसाठी कोण बलिदान देणार, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरु झाली आहे. (ind vs sa team india pujara rahane or vihari who will player dropeed to 3rd test match due to virat kohli comeback in playing eleven)
या तिघांवर टांगती तलवार
चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि हनुमा विहारी या तिघांवर टांगती तलवार आहे. विराटच्या कमबॅकनंतर या तिघांपैकी एकाला तिसऱ्या कसोटीला मुकावं लागू शकतं. विराटला दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीत खेळता आलं नाही. त्यामुळे त्याच्या जागी हनुमाला संधी देण्यात आली होती.
पुजारा आणि रहाणे हे दोघेही टीम इंडियाचे अनुभवी खेळाडू आहेत. मात्र या दोघांना काही महिन्यांपासून उल्लेखनीय कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे या दोघांवर टांती तलवार आहे. तर दुसऱ्या कसोटीत विराटच्या जागेवर संधी मिळालेल्या विहारीलाही तितकाच धोका आहे. त्यामुळे या तिघांपैकी कोणाचा पत्ता कट होणार, याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे.
मालिकेचा निकाल लागणार
दरम्यान आफ्रिकेने दुसरा सामना जिंकत 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली आहे. त्यामुळे तिसरा आणि शेवटचा सामना हा निर्णायक होणार आहे. त्यामुळे टीम इंडिया आफ्रिकेत तिसरा सामना जिंकत मालिका जिंकणार की आफ्रिका वरचढ ठरणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.