मुंबई : टीम इंडियाचा युवा क्रिकेटर ईशान किशनने (Ishan Kishan) श्रीलंका विरुद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात तुफानी खेळी केली. ईशानने 56 चेंडूत 89 धावा चोपल्या. त्याच्या या खेळीसाठी क्रिकेट विश्वातून कौतुक केलं गेलं. मात्र टीम इंडियाचे माजी कर्णधार 'ईशान'दार खेळीनंतरही नाराज आहेत. 'लिटील मास्टर' सुनील गावसकर Sunil Gavaskar) यांनी ईशानच्या बॅटिंगमधील एक कमी बाजू सांगितली आहे. (ind vs sl 1st t 20i team india foremer captain sunil gavskar aka littile master is not happy about ishan kishan 89 runs smashing innings)
सुनील गावसकर काय म्हणाले?
"मला ईशानचे प्रयत्न आणि त्याच्या खेळीचं महत्त्व कमी करायंच नाहीये. त्याने चांगल्या पद्धतीने कव्हर ड्राईव्ह आणि पुल शॉट मारले. पण ही एकच खेळी आहे, आपल्याला आणखी वाट पाहायला हवी. ईशानला उसळत्या आणि त्याच्या खांद्यावरुन जाणाऱ्या चेंडूंचा सामना नीट करता आला नाही. त्याच्या एका खेळीवरुन आपण निष्कर्ष काढणं चुकीचं आहे", असं गावसकर म्हणाले.
"ईशानने श्रीलंका विरुद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात चांगली बॅटिंग केली. पण हा पहिलाच सामना आहे. ईशानला वेस्टइंडिज विरुद्धच्या टी 20 मालिकेत लेंथ, पेस आणि बाऊन्सरचा सामना करता आला नाही. श्रीलंके विरुद्धच्या सामन्यात चेंडू हा त्याच्या खांद्यापर्यंत येत होता. त्यामुळे त्याला धावा करणं सोपं गेलं", असं गावसकर म्हणाले.
"श्रीलंकेच्या खराब गोलंदाजीचा पुरेपूर फायदा घेत ईशान हिट ठरला. ईशानचा टॉपच्या टीमच्या गोलंदाजीचा सामना करताना त्याचा खरा कस लागेल", असंही गावसकर यांनी नमूद केलं.