World Test Championship 2023-2025 Points Table: पाकिस्तानने श्रीलंकेला पहिल्या कसोटी सामन्यामध्ये पराभूत करत मोठ्या विजयाची नोंद केली. हा सामना पाकिस्तानने 4 गडी राखून जिंकला. भारतीय संघानेही वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटीत यजमान संघाचा दारुण पराभव केला. हे सर्व कसोटी सामने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-2025 अंतर्गत खेळवले जाणार आहेत. त्यामुळेच सर्व संघ संपूर्ण प्रयत्नाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइण्ट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी राहण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये पहिल्या स्थानासाठी चुरस दिसत आहे. पाकिस्तान आणि भारताने आपआपले पहिले कसोटी सामने जिंकले असले तरी भारत हा पाकिस्तानपेक्षा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइण्ट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी आहे. हे कसं काय हेच आपण जाणून घेऊयात.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइण्ट्स टेबलमध्ये भारत सध्या पहिल्या स्थानी आहे. भारताने पहिल्या कसोटीमध्ये वेस्ट इंडिजला पराभूत करुन पहिलं स्थान पटकावलं आहे. भारताच्या खात्यात 12 पॉइण्ट्स आहेत. भारत एक सामना खेळला असून तो जिंकल्याने भारताच्या विजयाची टक्केवारी ही 100 टक्के आहे. पाकिस्तानची स्थितीही अशीच आहे. पाकिस्तानच्या खात्यामध्येही 12 पॉइण्ट्स असून त्यांच्याही विजयाची टक्केवारी 100 आहे.
दोन्ही संघांचे पॉइण्ट्स आणि विजयाची टक्केवारी 100 असूनही भारत पहिल्या स्थानी कसा असा प्रयत्न पडला असेल तर भारताने वेस्ट इंडिजला मोठ्या फरकाने पराभूत केलं होतं हे लक्षात घेणं गरजेचं आहे. भारताने तिसऱ्या दिवशीच सामना एक डाव आणि 141 धावांनी जिंकला होता. तर दुसरीकडे पाकिस्तानी संघ जिंकला असला तरी त्यांना शेवटच्या दिवशी विजय मिळाला. हा विजयही केवळ 4 गडी राखून मिळाला. कमी फरकाने पाकिस्तानने श्रीलंकेवर विजय मिळवल्यानेच ते समान गुण आणि विजयाची टक्केवारी असूनही ते दुसऱ्या स्थानी आहेत.
ऑस्ट्रेलियाचा संघाने अॅशेज 2023 मध्ये पहिल्या 2 सामन्यांमध्ये विजय मिळवला होता. ऑस्ट्रेलियाने 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या खात्यावर 22 पॉइण्ट्स आहेत. त्यांच्या विजयाची टक्केवारी 61.11 इतकी आहे. तर दुसरीकडे इंग्लंडच्या संघाने 3 पैकी 1 सामना जिंकला आहे. इंग्लंडचा संघ 10 गुणांसहीत चौथ्या स्थानी आहे.
भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिजविरुद्ध दुसरा कसोटी सामना खेळत असून पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतीय संघ मजबूत स्थितीत असल्याचं दिसत आहे. भारतीय संघाने पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा 4 गड्यांच्या मोबदल्यात 288 धावांपर्यंत मजल मारली आहे.