पुणे : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारताचा इनिंग आणि १३७ रननी विजय झाला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा हा सगळ्यात मोठा विजय आहे. याआधी २०१० साली भारताने कोलकात्याला दक्षिण आफ्रिकेचा इनिंग आणि ५७ रननी पराभव केला होता.
दुसऱ्या टेस्ट मॅचमधल्या विजयाबरोबरच भारताने ३ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये २-०ने विजयी आघाडी घेतली आहे. या सीरिजमध्ये विजय मिळवून भारताने विश्वविक्रम केला आहे. भारताचा घरच्या मैदानातला हा सलग ११वा टेस्ट सीरिज विजय आहे. याआधी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता. ऑस्ट्रेलियाने रिकी पॉण्टिंगच्या नेतृत्वात घरच्या मैदानात लागोपाठ १० टेस्ट सीरिज जिंकल्या होत्या.
वेस्ट इंडिजने १९७५-७६ ते १९८५-८६ या कालावधीमध्ये वेस्ट इंडिजने लागोपाठ ८ सीरिजमध्ये विजय मिळवला होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये भारताचा पराभव झाला तरीही ही सीरिज भारताच्याच नावावर होणार आहे. या सीरिजची तिसरी मॅच १९ ऑक्टोबरपासून रांचीमध्ये सुरु होणार आहे.