'सचिन आणि द्रविडकडेही चेतेश्वर पुजारासारखी 'नजर' नव्हती'

पुजाराच्या चिवट खेळीमुळे ऑस्ट्रेलिय गोलंदाज हतबल झाले होते.

Updated: Jan 10, 2019, 06:28 PM IST
'सचिन आणि द्रविडकडेही चेतेश्वर पुजारासारखी 'नजर' नव्हती' title=

मुंबई: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या चेतेश्वर पुजाराची सध्या क्रिकेटविश्वातील मान्यवरांकडून तारीफ होत आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनीही नुकतीच पुजाराच्या खेळाची प्रशंसा केली. एखादा फटका खेळताना पुजाराची नजर शेवटपर्यंत चेंडूवर असते. मी आतापर्यंत कोणत्याही फलंदाजाला चेंडू जवळ आल्यानंतरही इतक्या एकाग्रतेने नजर खिळवून ठेवताना पाहिले नाही. याबाबतीत पुजाराने सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांनाही मागे टाकले आहे. पुजाराची एकाग्रता खरोखरच थक्क करणारी आहे. त्यामुळे मी माझ्या संघातील खेळाडुंना त्याच्यासारखी चांगली कामगिरी करण्याचा सल्ला देईन, असे लँगर यांनी सांगितले. 

...म्हणून कसोटी स्पेशालिस्ट पुजारा काही महिन्यांसाठी 'गायब' होणार

भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका २-१ अशा फरकाने जिंकून ऐतिहासिक यश संपादन केले होते. पुजाराने या मालिकेत ७४.४२ च्या सरासरीने सर्वाधिक ५२१ धावा केल्या. या मालिकेत पुजाराने १२५८ चेंडुंचा सामना केला. चेतेश्वर पुजाराने ४ सामन्यात ३ शतके ठोकली. शेवटच्या सामन्यात तर त्याने १९३ धावांची खेळी केली. पुजाराने एकट्याने खेळपट्टीवर व्यतीत केलेला वेळ विचारात घेतल्यास तो तब्बल पाच दिवस एकटाच ठाण मांडून उभा होता. त्याच्या या चिवट खेळीमुळे ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या कसोटीतील पहिल्या व दुसऱ्या डावात अनुक्रमे १७० आणि २०० षटके टाकावी लागली होती. एकूणच या मालिकेतील पुजाराची कामगिरी निर्णायक ठरली होती. यानिमित्ताने टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाच्या भूमीत प्रथमच कसोटी मालिका जिंकण्याचा भीमपराक्रम केला. यापूर्वी इंग्लंड, विंडीज, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका या ४ देशांनाच अशी कामगिरी जमली होती.