India vs Bangladesh: बांगलादेशविरोधातील पहिल्या कसोटी सामन्यात ऋषभ पंतने (Rishabh Pant) तुफान फलंदाजी करत शतक ठोकल्याने चाहत्यांना आनंद झाला आहे. अपघातामुळे क्रिकेटपासून जवळपास दीड वर्षं दूर असणाऱ्या ऋषभ पंतने जबरदस्त पुनरागन केलं आहे. ऋषभ पंत मैदानात आपल्या नेहमीच्या अंदाजात निर्भयपणे खेळताना दिसला. पंत बांगलादेशच्या गोलंदाजांवर अक्षरश: तुटून पडला होता. यादरम्यान शुभमन गिलने (Shubhman Gill) त्याला चांगली साथ दिली. ऋषभ पंतने आपल्या 109 धावांच्या खेळीत चार षटकार ठोकले.
सामन्यानंतर ऋषभ पंतने बीसीसीआयच्या सोशल मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्याने कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन केल्यानंतर कसं वाटलं यावर भाष्य केलं. खासकरुन तिसऱ्या दिवशी शतक ठोकल्यानंतर काय भावना होत्या हेदेखील सांगितलं. "मी फार घाबरलेलो होतो. पण माझ्या आतमध्ये एक आग होती, जी काहीतरी करण्यास प्रेरणा देत होती आणि मी ते करुन दाखवलं".
ऋषभ पंतने शुभमन गिलच्या सोबतीने 167 धावांची भागीदारी केली. ऋषभ पंत आणि शुभमन गिल फार चांगले मित्र असून, ही मैत्री दिवसेंदिवस घट्ट होत आहे. शुभमन गिलने सामन्यानंतर कशाप्रकारे पंतने आपली बॅट तोडली असती याबद्दल सांगितलं होतं. पंतने यावेळी यावर तसंच शुभमन गिलसोबतची भागीदारी आणि मैत्री यावरही भाष्य केलं.
चेन्नई कसोटी सामन्यात शुभमन गिल आणि ऋषभ पंत यांनी जबरदस्त फलंदाजी केली. या दोघांनी बांगलादेशविरुद्ध 167 धावांची भागीदारी केली होती. या भागीदारीदरम्यान पंत गिलसाठी अडचणीचे कारण बनला होता आणि त्याचे मोठे नुकसान होणार होते. हे टाळण्यासाठी गिल त्याची बॅट त्याच्यापासून दूर ठेवत होता. वास्तविक, तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर शुभमन गिल पत्रकार परिषदेसाठी आला होता. यादरम्यान त्याने दुसऱ्या डावात जुन्या बॅटने खेळत असल्याचा खुलासा केला. त्यांच्या भागीदारीदरम्यान पंत वारंवार त्याच्या बॅटला पंच मारत होता. पंतच्या पंचामुळे त्याची बॅट तुटेल अशी भीती गिलला होती.
पंतने सांगितलं की, "एक गोष्ट आज मला समजली आहे की, जेव्हा मैदानाबाहेर तुमचं नातं घट्ट असतं तेव्हा त्याच्यासोबत फलंदाजी करतानाही फायदा होतो. जेव्हा तुम्ही मैदानाबाहेर फार चांगले मित्र असता तेव्हा तुम्हाला तो व्यक्ती काय विचार करत आहे, खेळ कसा सुरु आहे या गोष्टी न सांगता समजतात. आम्हाला स्वत:ला शांत करायचं होतं आणि एक चांगली भागीदारी उभी करायची होती".
दरम्यान फलंदाजी करताना ऋषभ पंत बांगलादेशच्या कर्णधाराला क्षेत्ररक्षण लावण्यात मदत करत होता. त्याचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. यामागील कारण सांगताना तो म्हणाला की, "मला वाटते की माझ्यासाठी खेळाची समज अशी आहे की तुम्ही जिथे खेळता तिथे क्रिकेटमध्ये सुधारणा झाली पाहिजे. म्हणून मी फक्त त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करत होतो की ते तिथे फिल्डिंग लावू शकतात. हे खरं तर भारी आहे, मला यामुळे आनंद झाला". भारत आणि बांगलादेशमधील दुसरा आणि अंतिम कसोटी सामना 27 सप्टेंबरला सुरु होणार आहे.