'हे अशिक्षित लोक...,' भारताने बांगलादेशचा 280 धावांनी पराभव केल्यानंतर पाकिस्तानी खेळाडू संतापला, 'यांची मैदानं....'

India vs Bangladesh: पाकिस्तानचा कसोटी मालिकेत 2-0 ने पराभव करणाऱ्या बांगलादेश संघाला भारताने मात्र पहिल्या कसोटीत 280 धावांनी पराभूत केलं आहे.     

शिवराज यादव | Updated: Sep 23, 2024, 05:23 PM IST
'हे अशिक्षित लोक...,' भारताने बांगलादेशचा 280 धावांनी पराभव केल्यानंतर पाकिस्तानी खेळाडू संतापला, 'यांची मैदानं....' title=

India vs Bangladesh: पाकिस्तानचा कसोटी मालिकेत 2-0 ने पराभव केल्यानंतर बांगलादेश संघाचं सगळीकडून तोंडभरुन कौतुक केलं जात होतं. यामुळेच बांगलादेश संघ भारतीय दौऱ्यावर येताना त्यांच्याकडून फार अपेक्षा होत्या. बांगलादेश संघाचं मनोबल उंचावलं असल्याने तेदेखील भारतीय संघाला कडवं आव्हान देतील असं वाटत होतं. मात्र पहिल्या कसोटी सामन्यात भारताने बांगलादेशचा दणदणीत पराभव केला. चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडिअमवर झालेल्या सामन्यात भारताने तब्बल 280 धावांनी बांगलादेशचा पराभव केला. भारतीय संघाने बांगलादेश संघाला आनंद साजरा करण्याची एकही संधी दिली नाही, आणि संपूर्ण सामन्यावर वर्चस्व ठेवलं. चौथ्या दिवशीच सामन्याचा निकाल लागला आणि भारताने सामना खिशात घातला. 

दरम्यान भारतीय संघाच्या विजयावर पाकिस्तानचा माजी खेळाडू बसीत अली व्यक्त झाला आहे. त्याने पिच क्युरेटर्सचं कौतुक केलं आहे. भारतीय संघाचं कौतुक करताना बसीतने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला खडेबोल सुनावले आहेत. पीसीबी ज्या प्रकारच्या खेळपट्टी तयार करतं त्यावर त्याने नाराजी जाहीर केली आहे. 

"बुमराहने 5, अश्विनने 6 केले, जडेजाने 5, तसंच सिराज आणि आकाश दीपने प्रत्येकी 2 विकेट्स मिळवले. अशाप्रकारे 20 गडी बाद झाले आहेत. गोलंदाजांनी आपल्या सर्व जबाबदाऱ्या चोख पार पाडल्या. भारताने दोन फिरकी गोलंदाज खेळवले. चेंडू फिरेल अशी अशा असल्याने त्यांनी दोन फिरकी गोलंदाजांना खेळवलं आणि तसंच झालं. याचं सर्व श्रेय पिच क्युरेटर्सला जातं. त्यांना कसोटी खेळपट्टी कशी तयार करायची हे उत्तम प्रकारे माहिती आहे. आमच्यासारखं नाही. मी त्यांच्या बाजूने नाही, पण माझ्यात प्रचंड संताप भरला आहे," असं बसीत अलीने सांगितलं.

पुढे तो म्हणाला की, "आपल्या देशात खेळपट्टीला काहीच महत्त्व नाही. ते सर्व अशिक्षित लोक आहेत. ज्यांनी अभिमानाने क्रिकेट खेळलं ते सर्व आज बोर्डावर आहेत. याच गोष्टीमुळे माझा संताप होत आहे. तुम्ही मुलांना काय शिकवत आहात".

"जर तुम्ही चांगल्या खेळपट्टी तयार केल्या तर 50 टक्के समस्या तिथेच सोडवली जाते. हवं तर सुनील गावसकर आणि जावेद मियाँदाद यांना विचारा. पण यांना हे समजतच नाही," असा संताप त्याने व्यक्त केला आहे. भारत आणि बांगलादेशमधील दुसरा आणि अंतिम कसोटी सामना 27 सप्टेंबरला सुरु होणार आहे.