Ind vs NZ: 'जास्त हिरो बनतोय का?', रोहित शर्माची आर अश्विनला विचारणा, स्टम्प माईकमध्ये कैद झाला संवाद

Ind vs NZ: न्यूझीलंडविरोधातील कसोटी सामन्यादरम्यान भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि रवीचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) यांच्यातील संवाद स्टम्प माईकमध्ये कैद झाला आहे.   

शिवराज यादव | Updated: Oct 22, 2024, 12:55 PM IST
Ind vs NZ: 'जास्त हिरो बनतोय का?', रोहित शर्माची आर अश्विनला विचारणा, स्टम्प माईकमध्ये कैद झाला संवाद title=

Ind vs NZ: न्यूझीलंडविरोधातील कसोटी सामन्यादरम्यान भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि रवीचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) यांच्यातील संवाद स्टम्प माईकमध्ये कैद झाला आहे. या मजेशीर संवादादरम्यान रोहित अश्विनला विकेट मिळवून देण्यास सांगत आहे. 'या डावखुऱ्याला मला बाद करायचं आहे. तो जास्त हिरो बनतोय,' असं रोहित शर्मा आर अश्विनला सांगत होता. बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडिअममध्ये झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने भारताचा 8 गडी राखून पराभव केला. 

दरम्यान रोहित शर्माने फक्त एका पराभवामुळे आम्ही आमची आक्रमक शैली बदलणार नाही असं स्पष्ट केलं आहे. कसोटीच्या पहिल्या डावात न्यूझीलंडने भारताला फक्त 46 धावांत ऑल आऊट करुन सामना एकतर्फी केला होता. पण भारताने दमदार पुनरागमन करत दुसऱ्या डावात 462 धावा करत कडवी झुंज दिली. 

"फक्त एक सामना किंवा मालिकेच्या आधारे आम्ही आमची विचारसरणी बदलणार नाही. कसोटी सामना हरण्याच्या भितीने आम्ही आमचे विचार बदलणार नाही," असं रोहित सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत सांगितलं. भारताने बांगलादेशविरोधातील मालिकेतही याच शैलीने खेळी करत दोन दिवस पाऊस पडल्यानंतरही सामना जिंकला.

"हे खरं तर प्रयत्न करण्याची बाब आहे. यामुळे तुम्ही विरोधी संघाला दबावात किंवा मागे आहात हे जाणवू देत नाही. जेव्हा तुम्ही खरंच मागे असता तेव्हा प्रयत्न करुन काही अनपेक्षित मोठ्या गोष्टी करण्याच्या प्रयत्नात असता आणि न घाबरता खेळता," असं रोहितने सांगितलं. पुढे तो म्हणाला की, "काही कसोटी सामन्यांमधून आम्ही नेमका काय विचार करतो हे दर्शवलं असून तसंच खेळणार आहोत. बोलणं एक गोष्ट आहे, पण आम्ही तिथे (बंगळुरु) जाऊन निर्भय क्रिकेट खेळलो". 

रोहितने यावेळी याची दुसरी बाजूही दाखवली. पाहुणा संघ भारतीय गोलंदाजांना आणि खासकरुन फिरकी गोलंदाजांना खेळण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधत असल्याचं तो म्हणाला. यावेळी रोहित शर्माने रचिन रवींद्रच्या शतकाचं उदाहरण दिलं. "रचिन रवींद्रने काही फटके चांगले खेळले. त्याने फिरकी गोलंदाजांविरोधात चांगली खेळी केली. त्याला आमचे फिरकी गोलंदाज नेमकं काय करायचा प्रयत्न करत आहेत हे समजलं आणि त्याने आपला नैसर्गिक खेळ खेळण्यापासून माघार घेतली नाही. रचिन आणि कॉनवे यांनी वेगवेगळे शॉट खेळत फिरकीपटूंवर दबाव आणला," असं रोहित म्हणाला.