पुन्हा सुपर ओव्हरचा थरार! भारताचा रोमांचक विजय

सुपर ओव्हरमध्ये पुन्हा एकदा भारताचा विजय झाला आहे.

Updated: Jan 31, 2020, 05:39 PM IST
पुन्हा सुपर ओव्हरचा थरार! भारताचा रोमांचक विजय title=

वेलिंग्टन : सुपर ओव्हरमध्ये पुन्हा एकदा भारताचा विजय झाला आहे. भारताने ठेवलेल्या १६६ रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडला १६५ रनच करता आल्या, त्यामुळे हा सामना टाय झाला. अखेर सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडचे बॅट्समन बॅटिंगला आले. ६ बॉलमध्ये न्यूझीलंडने १३ रन केले, त्यामुळे भारताला विजयासाठी १४ रनचं आव्हान मिळालं.

सुपर ओव्हरमध्ये भारताकडून केएल राहुल आणि विराट कोहली बॅटिंगला आले. केएल राहुलने टीम साऊदीच्या पहिल्या बॉलला सिक्स आणि दुसऱ्या बॉलला फोर मारली. पहिल्या २ बॉलमध्येच १० रन केल्यानंतर तिसऱ्या बॉलला केएल राहुल आऊट झाला. यानंतर चौथ्या बॉलला विराट कोहलीने २ रन केले. पाचव्या बॉलला फोर मारून विराटने भारताला मॅच जिंकवली. 

लागोपाठ २ सुपर ओव्हरमध्ये भारताने विजय मिळवला आहे. याआधी बुधवारी झालेल्या मॅचचा निकालही सुपर ओव्हरमध्येच लागला. त्या मॅचमध्ये भारताला विजयासाठी शेवटच्या २ बॉलमध्ये १० रनची गरज होती, तेव्हा रोहित शर्माने या दोन्ही बॉलवर सिक्स मारून भारताला विजय मिळवून दिला.

भारताने ठेवलेल्या १६६ रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडला २० ओव्हरमध्ये ७ विकेट गमावून १६५ रन करता आल्या. न्यूझीलंडकडून ओपनर कॉलिन मुन्रोने ४७ बॉलमध्ये सर्वाधिक ६४ रन केले. तर टीम सायफर्टला ३९ बॉलमध्ये ५७ रन करता आले. शेवटच्या ओव्हरमध्ये न्यूझीलंडला विजयासाठी ७ रनची गरज होती. शार्दूल ठाकूरने २०व्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलला रॉस टेलरला माघारी धाडलं. यानंतर डॅरेल मिचेलने ठाकूरच्या दुसऱ्या बॉलवर फोर मारली. यानंतर न्यूझीलंड सामना जिंकेल असं वाटत असतानाच टीम सायफर्ट रन आऊट झाला. चौथ्या बॉलला मिचेल सॅन्टनरने एक रन काढली, तर पाचव्या बॉलला डॅरेल मिचेल आऊट झाला. सहाव्या बॉलला २ रनची गरज असताना मिचेल सॅन्टनरने १ रन काढली, पण दुसरी रन घेताना तो आऊट झाला. यामुळे मॅच सुपर ओव्हरमध्ये गेली. 

भारताकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक २ विकेट घेतल्या, तर जसप्रीत बुमराह आणि युझवेंद्र चहलला प्रत्येकी १-१ विकेट मिळाली. 

वेलिंग्टनच्या मैदानात झालेल्या या मॅचमध्ये न्यूझीलंडचा कर्णधार टीम साऊदीने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. किवींचा नेहमीचा कर्णधार केन विलियमसन दुखापतीमुळे ही मॅच खेळत नव्हता, तर भारताने रोहित शर्मा, रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमीला विश्रांती दिली. या तिघांच्याऐवजी संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर आणि नवदीप सैनीला संधी देण्यात आली. केएल राहुल आणि संजू सॅमसन या मॅचमध्ये ओपनिंगला बॅटिंगला आले, पण संजू सॅमसनला त्याला मिळालेल्या संधीचं सोनं करता आलं नाही. सॅमसन ५ बॉलमध्ये ८ रन करुन माघारी परतला. यानंतर भारताला वारंवार धक्के लागले. भारताची अवस्था ११.३ ओव्हरमध्ये ८८/६ अशी झाली होती. पण मनिष पांडेने शार्दूल ठाकूूर आणि नवदीप सैनीच्या मदतीने भारताला १६५ रनपर्यंत पोहोचवलं. मनिष पांडेने सर्वाधिक नाबाद ५० रन केले. शार्दुल ठाकूरने २० रन आणि नवदीप सैनीने ११ रन करुन पांडेला चांगली साथ दिली. केएल राहुलने ३९ रनची खेळी केली. 

५ टी-२० मॅचच्या या सीरिजच्या चारही मॅच भारताने जिंकल्या आहेत. सीरिजची शेवटची टी-२० मॅच आता रविवारी २ फेब्रुवारीला खेळवण्यात येणार आहे. या मॅचमध्येही विजय करुन न्यूझीलंडला व्हाईट वॉश करण्याची संधी भारताला आहे. भारतीय टीम पहिल्यांदाच ५ टी-२० मॅचची सीरिज खेळत आहे, त्यामुळे पहिल्यांदाच ५-०ने विजय मिळवून विक्रम करण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरेल.