माऊंट मॉनगनुई : दुसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये ओपनरच्या चांगल्या कामगिरीनंतरही भारताची पडझड झाली . नाणेफेक जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतलेल्या भारतानं ५० ओव्हरमध्ये ४ विकेट गमावून ३२४ धावा केल्या. भारताकडून रोहित शर्मानं सर्वाधिक ८७ धावांची खेळी केली. तर शिखर धवन ६६ धावा करून माघारी गेला. रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्यामध्ये ओपनिंगसाठी १५४ धावांची भागीदारी झाली. अंबाती रायुडूनं ४९ बॉलमध्ये ४७ धावा केल्या. तर कर्णधार विराट कोहलीला ४५ बॉलमध्ये ४३ धावा करता आल्या. एम.एस.धोनी आणि केदार जाधव यांनी शेवटच्या काही ओव्हरमध्ये फटकेबाजी करत भारताला या धावसंख्येपर्यंत पोहोचवलं. धोनीनं ३३ बॉलमध्ये नाबाद ४८ धावा आणि केदार जाधवनं १० बॉलमध्ये नाबाद २२ धावा केल्या. न्यूझीलंडकडून ट्रेन्ट बोल्ट आणि लॉकी फरग्युसनला प्रत्येकी २-२ विकेट मिळाल्या.
रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्यामध्ये १५४ धावांची भागीदारी झाली असली तरी या दोन्ही बॅट्समनची विकेट गेल्यानंतर भारताच्या कोणत्याच बॅट्समनला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. एकावेळी भारताचा स्कोअर ३५० धावांपर्यंत जाईल, असं वाटत होतं, पण भारताला ३२४ धावांवरच समाधान मानावं लागलं आहे. ४१-४५ या ओव्हरमध्ये भारतानं एकही विकेट न गमावता फक्त २९ धावा करता आल्या. अखेरच्या ओव्हरमध्ये धोनी आणि केदार जाधवनं फटकेबाजी केल्यामुळे भारताला या धावसंख्येपर्यंत मजल मारता आली.
याआधी मागच्या एकदिवसीय सामन्यामध्येही शिखर धवननं ७५ धावांची खेळी केली होती. या सामन्यामध्ये भारतानं नाणेफेक जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. या सामन्यामध्ये भारतानं संघामध्ये कोणताही बदल केलेला नाही. पहिल्या सामन्यात आठ गडी राखून यजमान संघाचा पराभव करणारा भारतीय संघ आज मोठ्या आत्मविश्वासामे मैदानात आला असून, प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विजयी पताका रोवण्याचच त्यांचं ध्येय असणार आहे. सध्याच्या घडीला पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेमध्ये भारतीय संघाकडे १-० अशी आघाडी असून, ही आघाडी कायम ठेवण्याकडेच कर्णधार विराट कोहली आणि संपूर्ण संघाचं लक्ष्य आहे.
भारतीय टीम : रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, अंबाती रायुडू, केदार जाधव, एम.एस. धोनी, विजय शंकर, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, युझवेंद्र चहल