माऊंट मॉनगनुई : न्यूझीलंड दौऱ्यामध्ये भारताची विजयी घोडदौड सुरुच आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारताचा ९० धावांनी विजय झाला आहे. भारतानं ठेवलेल्या ३२५ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ २३४ धावांवर ऑल आऊट झाला. भारताच्या या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडला सुरुवातीपासूनच धक्के लागले. भारताकडून कुलदीप यादवनं सर्वाधिक ४ विकेट घेतल्या. तर युझवेंद्र चहलला २, भुवनेश्वर कुमारला २, मोहम्मद शमी आणि केदार जाधवला प्रत्येकी १-१ विकेट मिळाली.
न्यूझीलंडला पहिला झटका २३ धावसंख्या असताना भुवनेश्वर कुमारने दिला. भुवनेश्वरने मार्टिन गुप्टीलला १५ धावावंर बाद केले. यानंतर भारतानं वारंवार न्यूझीलंडला झटके दिले. न्यूझीलंडच्या ब्रेसवेलचा अपवाद वगळता कोणत्याच खेळाडूला मोठी धावसंख्या करता आली नाही. न्यूझीलंड कडून फक्त ५ व्या विकेटसाठी ४६ धावांची सर्वोच्च भागीदारी करता आली. टॉम लेथम आणि हेनरी निकोलस यांच्यामध्ये ही भागीदारी झाली.
न्यूझीलंडच्या पहिल्या सहा खेळाडूंनी चांगली सुरुवात केली होती, पण यांना मोठी धावसंख्या करण्यापासून भारतीय गोलंदाजांनी रोखले. न्यूझीलंडच्या ब्रेसवेलनं सर्वाधिक ५७ धावा केल्या.
नाणेफेक जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतलेल्या भारतानं ५० ओव्हरमध्ये ४ विकेट गमावून ३२४ धावा केल्या. भारताकडून रोहित शर्मानं सर्वाधिक ८७ धावांची खेळी केली. तर शिखर धवन ६६ धावा करून माघारी गेला. रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्यामध्ये ओपनिंगसाठी १५४ धावांची भागीदारी झाली. अंबाती रायुडूनं ४९ बॉलमध्ये ४७ धावा केल्या. तर कर्णधार विराट कोहलीला ४५ बॉलमध्ये ४३ धावा करता आल्या. एम.एस.धोनी आणि केदार जाधव यांनी शेवटच्या काही ओव्हरमध्ये फटकेबाजी करत भारताला या धावसंख्येपर्यंत पोहोचवलं. धोनीनं ३३ बॉलमध्ये नाबाद ४८ धावा आणि केदार जाधवनं १० बॉलमध्ये नाबाद २२ धावा केल्या. न्यूझीलंडकडून ट्रेन्ट बोल्ट आणि लॉकी फरग्युसनला प्रत्येकी २-२ विकेट मिळाल्या.
रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्यामध्ये १५४ धावांची भागीदारी झाली असली तरी या दोन्ही बॅट्समनची विकेट गेल्यानंतर भारताच्या कोणत्याच बॅट्समनला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. एकावेळी भारताचा स्कोअर ३५० धावांपर्यंत जाईल, असं वाटत होतं, पण भारताला ३२४ धावांवरच समाधान मानावं लागलं आहे. ४१-४५ या ओव्हरमध्ये भारतानं एकही विकेट न गमावता फक्त २९ धावा करता आल्या. अखेरच्या ओव्हरमध्ये धोनी आणि केदार जाधवनं फटकेबाजी केल्यामुळे भारताला या धावसंख्येपर्यंत मजल मारता आली. याआधी मागच्या एकदिवसीय सामन्यामध्येही शिखर धवननं ७५ धावांची खेळी केली होती.