India Vs New Zealand Test Rohit Sharma: भारतीय कसोटी संघाचा कर्णधार रोहित श्रमाने आपल्याला 8 ते 9 वेगवान गोलंदाजांचा पर्याय हवा असल्याच विचित्र मागणी केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी रवाना होण्याआधी रोहितने ही मागणी केली आहे. भारतीय संघ बॉर्डर-गावसकर चषकाअंतर्गत 5 कसोटी खेळणार आहे. ही मालिका 22 नोव्हेंबरपासून सुरु होत आहे. पर्थ येथील कसोटीपासून या दौऱ्याची सुरुवात होणार असली तरी त्यापूर्वी भारतीय संघ आता मायदेशात न्यूझीलंविरुद्ध खेळणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वीची ही तयारीची मालिका म्हणून पाहिलं जात असून या मालिकेसाटी निवड समितीने हर्षित राणा, मयांक यादव, नितीश रेड्डी आणि प्रसिद्ध कृष्णा या चौघांचा राखीव म्हणून समावेश केला आहे.
प्रसिद्ध कृष्णाने रणजी चषक स्पर्धेमधील सामन्यात स्वत:ला जखमी करुन घेतल्याने तो सध्या सरावामध्ये सहभागी झालेला नाही. अन्य तीन राखीव गोलंदाज म्हणजेच हर्षित राणा, मयांक यादव, नितीश रेड्डी सध्या बंगळुरुमध्ये संघासोबत आहेत. 16 ऑक्टोबरपासून भारत आणि न्यूझीलंडदरम्यान पहिली कसोटी सुरु होत आहे. या सामन्यामध्ये जसप्रीत बुमराह, महोम्मद सिराज, आकाश दीप हे तिघे मुख्य संघामध्ये असतील. मोहम्मद सिराज हा दुखापतीमधून सावरत आहे. बंगलादेशविरुद्धच्या मालिकेमध्ये यश दयालचीही निवड करण्यात आली आहे.
"आम्ही अनेक गोलंदाजांना मुख्य संघाशी संलग्न ठेवलं आहे कारण आम्ही त्यांना ऑस्ट्रेलिया घेऊन जाण्याचा विचार करत आहोत. आम्हाला त्यांच्यावर लक्ष ठेवायचं आहे. त्याचं वर्कलोड बॅलेन्स करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यापैकी अनेकजण अनेकदा जखमी झाले आहेत. त्यामुळेच आम्ही यांच्यावर लक्ष ठेऊन त्यांना तयार करणं महत्त्वाचं आहे. यामधून आपल्याकडे काय पर्याय आहेत याची चाचपणी करता येईल. आम्हाला बेंच स्टेंथ वाढवायची आहे. आम्हाला वेगवान गोलंदाजांची टीम तयार करायची आहे. आमच्याकडे वेगवान गोलंदाजाचे 8 ते 9 पर्याय तयार असायला हवेत. आम्हाला केवळ 3 ते 4 पर्याय उपलब्ध आहेत, अशी स्थिती नकोय. म्हणून आम्ही नव्याने प्रयत्न करतोय," असं रोहितने न्यूझीलंविरुद्धच्या पहिल्या सामन्याआधी म्हटलं आहे.
"फलंदाजांसंदर्भात खूप पर्याय उपलब्ध आहेत. अशीच स्थिती गोलंदाजांसंदर्भात असावी अशी आमची इच्छा आहे. त्यामुळेच आम्ही त्यांना संघात स्थान दिलं आहे. ते जबाबदारी स्वीकारण्यास तयार असतील तर आम्ही नक्कीच ती देऊ. त्यांच्यापैकी अनेकजण आधी काही सामने खेळलेत. दुलीप चषक, इराणी चषकामध्ये ते खेळलेत. त्यामुळेच ते लोक देखरेखीखाली राहतील असे आमचे प्रयत्न आहेत. त्यांच्या वर्कलोडची काळजी घेतली जात आहे. जेव्हा तुम्हाला टॅलेंटेड खेळाडू दिसतात त्यांना संघाच्या जास्तीत जास्त जवळ आणण्याचा तुमचा प्रयत्न असतो. फार कमी वेळात या गोलंदाजांनी ते मुख्य संघाचा भाग बनू शकतात अशी कामगिरी केली आहे. आता त्यांना संघाबरोबर ठेऊन ते अंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी तयार आहेत की नाही याची चाचपणी आम्ही करणार आहोत. खास करुन कसोटी क्रिकेटसाठी त्यांचा विचार केला जाईल. कसोटी क्रिकेट हे फार वेगळ्या पद्धतीचं आहे. या खेळाडूंकडे जे काही टॅलेंट आहे ते समोर आणू शकतात का हे आम्ही पाहत आहोत. ते आम्हाला काय देऊ इच्छितात, कशी कामगिरी करतात यावर आमचं लक्ष आहे. यामुळे आमच्याकडे बरेच पर्याय उपलब्ध राहतील," असं रोहित म्हणाला.
"एखाद्या आघाडीच्या गोलंदाजाला काही झालं तर आम्ही अडचणीत येणार नाही असा प्रयत्न आहे. काही ठराविक लोकांवर आपण अवलंबून आहोत असं आम्हाला नकोय. हे असं करणं योग्य नाही. काही वेळेनंतर आपल्याला भविष्याबद्दल विचार करावा लागणार आहे. त्यामुळेच योग्य खेळाडू निवडले गेले पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे," असंही रोहितने सांगितलं.