विराटचा विक्रम; ७ द्विशतकं करणारा पहिला भारतीय

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये विराट कोहलीने खणखणीत द्विशतक झळकावलं आहे.

Updated: Oct 11, 2019, 03:50 PM IST
विराटचा विक्रम; ७ द्विशतकं करणारा पहिला भारतीय title=

पुणे : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये विराट कोहलीने खणखणीत द्विशतक झळकावलं आहे. टेस्ट क्रिकेटमधलं हे विराटचं सातवं द्विशतक आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये ७ द्विशतकं करणारा विराट हा एकमेव खेळाडू आहे. सचिन तेंडुलकर आणि विरेंद्र सेहवाग यांच्या ६ द्विशतकांचा विक्रम विराटने मोडित काढला. राहुल द्रविड याने टेस्ट क्रिकेटमध्ये ५ द्विशतकं आणि सुनिल गावसकर यांनी ४ द्विशतकं केली आहेत. विराट कोहली २५४ रनवर नाबाद राहिला. भारताने ६०१/५ वर डाव घोषित केला. 

याच मॅचमध्ये विराट कोहलीच्या टेस्ट क्रिकेटमध्ये ७ हजार रनही पूर्ण झाल्या आहेत. सगळ्यात कमी इनिंगमध्ये ७ हजार रनचा टप्पा गाठणारा विराट हा जगातला चौथा खेळाडू बनला आहे. विराटने १३८ इनिंगमध्ये ७ हजार रनचा टप्पा ओलांडला आहे. वॉली हॅमंड यांनी १३१ इनिंगमध्ये, विरेंद्र सेहवागने १३४ इनिंगमध्ये, सचिन तेंडुलकरने १३६ इनिंगमध्ये, गॅरी सोबर्स, कुमार संगकारा आणि विराटने १३८ इनिंगमध्ये आणि मोहम्मद युसुफने १३९ इनिंगमध्ये ७ हजार रन पूर्ण केले.

कर्णधार म्हणून विराट कोहलीचं टेस्ट क्रिकेटमधलं हे १९वं शतक आहे. याचबरोबर त्याने ऑस्ट्रेलियाच्या रिकी पाँटिंगशी बरोबरी केली आहे. कर्णधार म्हणून दक्षिण आफ्रिकेच्या ग्रॅम स्मिथची सर्वाधिक २५ शतकं आहेत.

कर्णधार असताना विराटने वनडेमध्ये २१ शतकं आहेत, म्हणजेच कर्णधार असताना विराटने एकूण ४० शतकं केली आहेत. कर्णधार असताना सर्वाधिक ४१ शतकं रिकी पाँटिंगच्या नावावर आहेत. पाँटिंगचा हा विक्रम मोडण्यासाठी विराटला २ शतकांची आवश्यकता आहे. 

विराट कोहलीचं टेस्ट क्रिकेटमधलं हे २६वं शतक होतं, या शतकासह विराटने इंजमाम उल हकच्या २५ शतकांना मागे टाकलं. आता विराटने स्टीव्ह स्मिथ आणि गॅरी सोबर्स यांच्या २६ शतकांच्या रेकॉर्डशी बरोबरी केली आहे.