गुवाहाटी : भारताचा कर्णधार विराट कोहलीनं आणखी एक खणखणीत शतक ठोकलं आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये विराटच्या शतकामुळे भारत मजबूत स्थितीत पोहोचला आहे. विराट कोहलीचं वनडे क्रिकेटमधलं हे ३६वं शतक आहे. वनडेत सर्वाधिक शतकं करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट दुसऱ्या क्रमांकावर आहे. सचिन तेंडुलकर याच्या नावावर वनडेमध्ये सर्वाधिक ४९ शतकांची नोंद आहे. १०७ बॉलमध्ये १४० रनची खेळी करून विराट कोहली आऊट झाला. विराटच्या खेळीमध्ये २१ फोर आणि २ सिक्सचा समावेश होता.
वेस्ट इंडिजनं ठेवलेल्या ३२३ रनचा पाठलाग करताना भारताला सुरुवातीलाच धक्का बसला. ओपनर शिखर धवन फक्त ४ रन करून माघारी परतला. पण विराट आणि रोहित शर्मानं भारतीय इनिंगला आकार दिला. विराट कोहली आणि रोहित शर्मामध्ये २४६ रनची पार्टनरशीप झाली. वनडेमध्ये रनचा पाठलाग करताना ही दुसरी सगळ्यात मोठी पार्टनरशीप आहे. रनचा पाठलाग करताना सर्वात मोठी पार्टनरशीप करण्याचं रेकॉर्ड रिकी पाँटिंग आणि शेन वॉटसनच्या नावावर आहे. २००९ साली सेंच्युरियनच्या मैदानात इंग्लंडविरुद्धच्या मॅचमध्ये वॉटसन आणि पाँटिंगमध्ये नाबाद २५२ रनची पार्टनरशीप झाली होती.
रनचा पाठलाग करताना विराटचं हे २२वं शतक आहे. तर घरच्या मैदानातलं १५वं, कर्णधार म्हणून १४वं आणि वेस्ट इंडिजविरुद्ध ५वं शतक आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध वनडेमध्ये सर्वाधिक शतकं करणारा भारतीय खेळाडूही विराट बनला आहे. याआधी सचिन तेंडुलकरनं वनडेमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वाधिक ४ शतकं केली होती.
रिकी पाँटिंग- २२
विराट कोहली- १४
एबी डिव्हिलियर्स- १३
सौरव गांगुली- ११
सनथ जयसूर्या- १०