दुसऱ्या वनडेमध्ये भारताची मजबूत सुरुवात, रोहित-राहुलची शतकं

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वनडे मॅचमध्ये भारताची मजबूत सुरुवात झाली आहे. 

Updated: Dec 18, 2019, 04:15 PM IST
दुसऱ्या वनडेमध्ये भारताची मजबूत सुरुवात, रोहित-राहुलची शतकं title=

विशाखापट्टणम : वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वनडे मॅचमध्ये भारताची मजबूत सुरुवात झाली आहे. रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी शानदार शतक केलं आहे. रोहित शर्माचं वनडे क्रिकेटमधलं हे २८वं शतक आहे. १०७ बॉलमध्ये रोहितने त्याचं शतक पूर्ण केलं. याचसोबत रोहित रिकी पाँटिंगच्या वनडे शतकांच्या विक्रमाजवळ पोहोचला आहे. पाँटिंगच्या नावावर वनडेमध्ये ३० शतकं आहेत. सर्वाधिक वनडे शतकं करण्याचा विक्रम सचिनच्या नावावर आहे. सचिनने वनडेमध्ये ४९ शतकं केली आहेत. या यादीत विराट दुसऱ्या क्रमांकावर आहे. विराटची वनडे क्रिकेटमध्ये ४३ शतकं झाली आहेत. तर पॉटिंग तिसऱ्या आणि रोहित चौथ्या क्रमांकावर आहे. 

एका वर्षात सर्वाधिक शतकं करणाऱ्या खेळाडूंच्या रेकॉर्डमध्ये रोहित संयुक्तरित्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. सचिनने १९९८ साली सर्वाधिक ९ वनडे शतकं केली होती. गांगुलीने २००० साली ७, डेव्हिड वॉर्नरने २०१६ साली ७ आणि आता २०१९ साली रोहित शर्माने ७ शतकं केली आहेत. २०१९ या वर्षात भारताची आणखी एक वनडे मॅच बाकी आहे. या मॅचमध्ये आणखी १ शतक करुन रोहितला स्वतंत्रपणे दुसरा क्रमांक गाठण्याची संधी आहे. 

केएल राहुल याचं हे वनडे क्रिकेटमधलं तिसरं शतक आहे. १०२ बॉलमध्ये राहुलने त्याचं शतक पूर्ण केलं. शतक पूर्ण झाल्यानंतर राहुल लगेचच माघारी परतला. राहुलने १०४ बॉलमध्ये १०२ रनची खेळी केली. यामध्ये ८ फोर आणि ३ सिक्सचा समावेश होता. रोहित शर्मा आणि केएल राहुल यांच्यात ओपनिंगसाठी २२७ रनची पार्टनरशीप झाली. 

वेस्ट इंडिजने या मॅचमध्ये टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. चेन्नईमध्ये झालेल्या पहिल्या वनडेमध्ये भारताला पराभवाचा धक्का बसला होता. त्यामुळे सीरिजमधलं आव्हान कायम ठेवण्यासाठी भारताला ही मॅच जिंकणं गरजेचं आहे. भारताने या मॅचमध्ये ऑलराऊंडर शिवम दुबेऐवजी शार्दुल ठाकूरला संधी दिली आहे.

भारतीय टीम

रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, केदार जाधव, रवींद्र जडेजा, दीपक चहर, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव

वेस्ट इंडिजची टीम

शाय होप, एव्हीन लुईस, शिमरन हेटमायर, निकोलास पूरन, रोस्टन चेस, कायरन पोलार्ड, जेसन होल्डर, कीमो पॉल, अल्झारी जोसेफ, शेल्डन कॉट्रेल, खेरी पेरी