'हिटमॅन'चा विक्रम! रोहितच्या जवळपासही कोणी नाही

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या तिसऱ्या टी-२० मॅचला सुरुवात होताच रोहित शर्माच्या नावावर विक्रमाची नोंद झाली आहे.

Updated: Dec 11, 2019, 07:28 PM IST
'हिटमॅन'चा विक्रम! रोहितच्या जवळपासही कोणी नाही title=

मुंबई : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या तिसऱ्या टी-२० मॅचला सुरुवात होताच रोहित शर्माच्या नावावर विक्रमाची नोंद झाली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४०० सिक्स मारणारा रोहित पहिला भारतीय खेळाडू बनला आहे. रोहित शर्माने तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलला कॉट्रेलला सिक्स मारून हा विक्रम केला.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये क्रिस गेलच्या नावावर सर्वाधिक सिक्सचा विक्रम आहे. गेलने एकूण तिन्ही फॉरमॅट मिळून ५३४ सिक्स मारले आहेत. तर पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीने ४७६ सिक्स लगावले.

भारताकडून सर्वाधिक सिक्स मारणाऱ्या खेळाडूंमध्ये रोहितनंतर धोनीचा नंबर लागतो. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३५९ सिक्स मारले आहेत. धोनी आणि रोहित या दोनच भारतीय खेळाडूंना ३०० पेक्षा जास्त सिक्स लगावता आल्या आहेत.

सर्वाधिक सिक्स मारण्याऱ्या भारतीयांमध्ये सचिन तेंडुलकर तिसऱ्या क्रमांकावर आहे. सचिनने त्याच्या कारकिर्दीत २६४ सिक्स लगावले. तर युवराज सिंगने २५१ आणि सौरव गांगुलीने २४७ सिक्स मारले. सेहवागने २४३ आणि विराटने १९९ सिक्स मारले आहेत.

वनडेमध्ये सर्वाधिक सिक्स मारणाऱ्यांच्या यादीत रोहित चौथ्या क्रमांकावर आहे. रोहितने वनडेमध्ये २३२ सिक्स मारले आहेत. शाहिद आफ्रिदी (३५१ सिक्स) या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. क्रिस गेल (३३१ सिक्स) आणि सनथ जयसूर्या (२७० सिक्स) दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. रोहितने ३२ टेस्ट मॅचमध्ये ५२ सिक्स मारले आहेत. एकूण टेस्ट मॅचपेक्षा जास्त सिक्स मारणाऱ्या ठराविक खेळाडूंमध्ये रोहित मोडतो.