नवी दिल्ली : आपल्या देशात क्रिकेट हा खेळ इतर सर्व खेळांपेक्षा अधिक लोकप्रिय आहे. त्यामुळे इतर खेळाडूंच्या तुलनेत क्रिकेटर्संना झुकते माप मिळते. त्यांना अधिक प्रसिद्ध, पैसा आणि आदर मिळतो. मात्र आपल्याच देशातील नेत्रहीन क्रिकेटमध्ये भारतीय टीमला उच्च स्थानावर नेलेला कर्णधार शेखर नायक आता मात्र रोजगारासाठी वणवण करत आहेत.
पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलेला हा क्रिकेटर शेखर १३ वर्ष भारतीय टीममध्ये खेळले आहे. शेखर यांचा जन्म कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्यात झाला. जन्मतः ते आंधळे होते. त्यांनी शारदा देवी स्कूल फॉर ब्लाईंडमध्ये आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. शाळेत असल्यापासूनच त्यांनी क्रिकेटचे विविध पैलू शिकायला सुरूवात केली. त्यानंतर त्यांची निवड राष्ट्रीय स्तरावर झाली आणि त्यानंतर ते २००२ ते २०१५ पर्यंत क्रिकेट खेळले. २०१० ते २०१५ पर्यंत त्यांनी भारतीय टीमचे कर्णधारपद भूषविले. त्यांच्या कॅप्टनसीखाली भारताने बंगळूरमध्ये टी२० विश्वकप आणि २०१५ मध्ये केपटाऊन क्रिकेट विश्वकप जिंकला.
मात्र वाढत्या वयानुसार त्यांचे टीममध्ये सिलेक्शन झाले नाही. त्यानंतर त्यांनी एका एनजीओमध्ये काम करायला सुरूवात केली. मात्र काही काळाने त्यांनी ती नोकरी सोडली. आता सध्या ते नोकरीच्या शोधात आहेत. त्यासाठी त्यांनी सरकारशी ही संपर्क साधला. त्यांना सरकारकडून आश्वासन देण्यात आले. मात्र अजूनही परिस्थिती बदललेली नाही.