Rohit Sharma on ODI World Cup: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये (World Test Championship) ऑस्ट्रेलियाकडून (Australia) 209 धावांनी झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर भारतीय क्रिकेट संघावर (Indian Cricket Team) सडकून टीका होत आहे. पुन्हा एकदा चॅम्पियनशिप जिंकण्यात अपयशी ठरलेल्या भारतीय संघाच्या निवडीवरुन प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. भारतासमोर 444 धावांचं आव्हान असताना पाचव्या दिवशी संघ 234 वर ऑल आऊट झाला. यामुळे भारतीय संघाचं आणखी एक आयसीसी ट्रॉफी (ICC Trophy) जिंकण्याचं स्वप्न भंगलं आहे. तसंच आयसीसी ट्रॉफी मायदेशी आणण्यासाठी गेल्या दशकापासून सुरु असलेली प्रतिक्षा पुढे वाढली आहे. 2013 मध्ये धोनीच्या नेतृत्वात भारताने चॅम्पियन्स जिंकली होती. त्यानंतर एकदाही भारताला आयसीसी ट्रॉफी जिंकता आलेली नाही.
सामन्यातील पराभवानंतर बोलताना भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने मोठं विधान केलं आहे. वर्ल्डकपमध्ये खेळताना आता भारतीय संघ पूर्ण वेगळी मानसिकता आणि दृष्टीकोन समोर ठेवणार असल्याचं रोहित शर्माने सांगितलं आहे. यावेळचा वर्ल्डकप भारतात होणार आहे.
"ऑक्टोबरमध्ये जेव्हा वर्ल्डकप सुरु होईल तेव्हा आम्ही वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न करु. आम्ही खेळाडूंना पूर्ण स्वातंत्र्य देऊ आणि सामना जिंकायचा आहे की नाही हा विचार करणार नाही. आम्ही याआधी नेहमीच हा सामना, ही स्पर्धा महत्त्वाची आहे, तसंच गोष्टी ठरवल्याप्रमाणे होत नाही आहेत असा विचार करत होतो. त्यामुळे नक्कीच आता आम्हाला वेगळ्या प्रकारे विचार करण्याची आणि ते कृतीत आणण्याची गरज आहे. गोष्टी वेगळ्या पद्धतीने करण्यावर आमचा भर असेल," असं रोहित शर्माने सांगितलं.
भारताला ऑस्ट्रेलियाने 444 धावांचे मोठं लक्ष्य दिलं होतं. सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी 40 धावांची भागिदारी करत चांगली सुरुवात केली होती. तथापि, ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजी आक्रमणाने भारताच्या फलंदाजीवर पूर्णपणे वर्चस्व गाजवलं. भारतीय संघ पाचव्या दिवशी लंचपर्यंतही टिकू शकला नाही.
"जर तुम्ही नीट पाहिलं तर मी आणि गिलने दुसऱ्या डावात सलामी करताना त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. चांगले फटके लगावत दबाव आणण्याचा प्रयत्न होता. म्हणूनच 10 ओव्हरमध्ये आम्ही 60 धावा केल्या होता. पण जेव्हा तुम्ही विचार करत खेळता तेव्हा बाद होण्याची शक्यता असते. मग लोक तुमचं पूर्ण लक्ष्य नव्हतं अशा कमेंट करतात. आमची एकाग्रता अजिबात कमी नव्हती. आम्ही फक्त वेगळ्या प्रकारे खेळण्याचा प्रयत्न करत होतो. आम्हाला काहीतरी वेगळं करायचं आहे. आम्ही इतक्या आयसीसी स्पर्धा खेळलो आहोत, पण एकही जिंकलो नाही आहोत. त्यामुळे आता वेगळ्या प्रकारे खेळण्यावर आणि काहीतरी वेगळं करण्यावर आमचा भर असेल," असं रोहितने सांगितलं आहे.
ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिप जिंकत सर्व आयसीसी पुरस्कार जिंकणारा पहिला संघ ठरला आहे. दरम्यान यामुळे ऑस्ट्रेलिया संघाने आता उत्साहात इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या ऍशेस कसोटीत प्रवेश केला आहे. दरम्यान या पराभवामुळे भारताला मोठा धक्का बसला आहे. 2021 मध्ये झालेल्या पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिपमध्ये न्यूझीलंडने भारताचा पराभव केला होता. त्यानंतर आता दुसऱ्यांदा भारताने संधी गमावली आहे.