Corona : लॉकडाऊनमध्ये कार घेऊन घराबाहेर, टीम इंडियाच्या खेळाडूवर कारवाई

कोरोना व्हायरसचा प्रसार थांबण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. 

Updated: Apr 12, 2020, 03:59 PM IST
Corona : लॉकडाऊनमध्ये कार घेऊन घराबाहेर, टीम इंडियाच्या खेळाडूवर कारवाई title=

शिमला : कोरोना व्हायरसचा प्रसार थांबण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. गरज नसताना घराबाहेर न पडण्याचा सल्ला केंद्र आणि सगळ्याच राज्यातील सरकार देत आहेत. पण टीम इंडियाकडून खेळलेला क्रिकेटपटू ऋषी धवन मात्र लॉकडाऊनमध्येही कारण नसताना घराबाहेर पडला, यामुळे त्याच्यावर कारवाई झाली आहे. हिमाचल प्रदेशच्या मंडीमध्ये ऋषी धवन कार घेऊन फिरत होता. पोलीस अधिक्षक गुरुदेव चंद शर्मा यांनी माध्यमांशी बोलताना धवनने दंडाची रक्कम दिल्याचं सांगितलं. 

ऋषी धवन कर्फ्यू दरम्यान आपली लक्झरी कार घेऊन रस्त्यावर उतरला होता. तेव्हा मंडी शहरातल्या गांधी चौकात ट्रॅफिक पोलिसांनी त्याला अडवलं आणि ५०० रुपयांचा दंड आकरला. भविष्यामध्ये अशी चूक न करण्याचा इशाराही पोलिसांनी ऋषी धवनला दिला आहे. धवनने स्वत:ची चूक मानून दंड भरला. चलान फाडण्याआधी ऋषी धवनला मार्केटमध्ये यायचं कारण विचारलं होतं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by Rishi Dhawan (@rishidhawan19) on

पोलिसांनी विचारलेल्या कारणाचं धवनला योग्य उत्तर देता आलं नाही, त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली. मंडी शहरामध्ये सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत कर्फ्यू उठवला जातो, पण पोलिसांच्या परवानगीशिवाय कोणालाही गाडी घेऊन फिरता येत नाही. कारण नसताना घराबाहेर पडणाऱ्यांकडून कर्फ्यू नसतानाही दंड आकारला जातो. ऋषी धवनने भारतासाठी ३ वनडे मॅच खेळल्या आहेत.