मुंबई : दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू हर्षल गिब्सनं वर्ल्ड कपबद्दलचं त्याचं भाकीत वर्तवलं आहे. भारतीय टीम ही वर्ल्ड कप जिंकण्याची प्रबळ दावेदार आहे, असं गिब्सला वाटतं. या वर्ल्ड कप स्पर्धेचे यजमानपद इंग्लंड टीमकडे आहे. इंग्लंडच्या यजमानपदाची ही पाचवी वेळ आहे. सोमवारी गिब्स क्रिकेट सुपर ओवर लीग च्या प्रचारासाठी आला होता, त्यावेळेस त्याने हे वक्तव्य केले.
गिब्स म्हणाला की, 'भारत आणि इंग्लंड या टीम वर्ल्ड कपसाठीच्या प्रबळ आणि तगड्या दावेदार आहेत. या स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये येणाऱ्या दोन टीम कोणत्या असतील, हे आता सांगणे तरी अवघड आहे. हे इंग्लंडच्या वातावरणावर देखील अवलंबून आहे. वर्ल्ड कपमध्ये बॉलर्सची भूमिका महत्वपूर्ण असेल.'
दक्षिण आफ्रिकेच्या टीममध्ये एबी डिविलियर्स नसल्याने टीम एकाकी पडल्याचे क्रिकेट चाहत्यांकडून म्हटले जात आहे. यावर गिब्स म्हणाला की 'डिविलियर्सच्या अनुपस्थितीत देखील दक्षिण आफ्रिकेची टीम मजबूत आहे. टीममध्ये फॅफ डु प्लेसिस आणि क्विंटन डी कॉक सारखे खेळाडू आहेत. पण टीममध्ये अष्टपैलू खेळाडू नसल्याची कमतरता नक्कीच जाणवेल.'
विशेष म्हणजेच या कार्यक्रमाला भारताचे माजी खेळाडू वीवीएस लक्ष्मण, वीरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग, मोहम्मद कैफ, सुरेश रैना, ब्रँडन मॅक्युलम, क्रिस लिन, आंद्रे रसेल आणि तिलकरत्ने दिलशान तसेच भारताचे उद्योन्मुख खेळाडू पृथ्वी शॉ, शुभमन गिल उपस्थित होते.
एका ठिकाणी दक्षिण आफ्रिकेचा हर्षल गिब्स भारतीय टीमला वर्ल्ड कपची दावेदार मानतो. तर भारत टीमनंतर इंग्लंड टीमदेखील आव्हान देईल, असं गिब्स म्हणाला. काही दिवसांपूर्वी सुनील गावसकर म्हणाले की, इंग्लंड टीम वर्ल्ड कपची दावेदार आहे.
वर्ल्ड कपसाठी भारतीय टीम प्रबळ दावेदार नसून इंग्लंड या वर्ल्ड कपचा दावेदार आहे, असे वक्तव्य भारताचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक सुनील गावसकर यांनी केले आहे. गावसकर 'इंडिया टुडे'शी बोलत होते. आगामी वर्ल्ड कपचे आयोजन इंग्लंडमध्ये करण्यात आले आहे. त्यामुळे इंग्लंडसाठी ही जमेची बाजू आहे. सुनील गावसकर म्हणाले की, 'इंग्लंडची टीम वर्ल्ड कपची दावेदार आहे. वर्ल्ड कपचे आयोजन इंग्लंड मध्ये करण्यात आले आहे, म्हणून ते प्रमुख दावेदार असल्याचे माझे म्हणणे नाही, पण इंग्लंडनं वनडे क्रिकेट खेळण्याच्या त्यांचा दृष्टीकोन बदलला आहे. या बदललेल्या दृष्टीकोनामुळे इंग्लंड दावेदार आहे', असं गावसकर यांनी सांगितले.
'भारतीय टीम सलगपणे इंग्लंडमध्ये दोन वर्ष खेळली आहे. त्यामुळे या अनुभवाचा फायदा भारतीय खेळाडूं होऊ शकतो. भारतीय टीम २०१७ आणि २०१८ ला इंग्लंडमध्ये खेळले आहेत. भारताकडून वर्ल्ड कपसाठी ज्या खेळाडूंची निवड होईल त्या खेळाडूंना इंग्लंड मधील परिस्थिती माहिती आहे.. त्यांना तिथे खेळण्याचा अनुभव आहे. वर्ल्ड कपचं जेतेपद मिळवण्यासाठी भारतीय टीमला या अनुभवाचा फायदा होऊ शकतो', असं गावसकर यांना वाटतं.