इंदूर : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेली तिसरी वन-डे मॅच जिंकत भारताने सीरिजही आपल्या खिशात घातली. यासोबतच या मॅचमध्ये रोहित शर्माने एक नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.
रोहित शर्माने इंदूरमध्ये झालेल्या तिसऱ्या वन-डे मॅचमध्ये ६२ बॉल्समध्ये ७१ रन्स केले. रोहितने आपल्या या इनिंगमध्ये ६ सिक्सर आणि ४ फोर लगावले. यासोबतच त्याने एक नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
रोहित शर्माने ऑस्ट्रेलिया विरोधात इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सर्वाधिक म्हणजेच ६३ सिक्सर लगावले आहेत. यापूर्वी न्यूझीलंडच्या ब्रॅण्डन मॅक्युलमच्या नावावर हा रेकॉर्ड होता. ब्रॅण्डन मॅक्युलमने ऑस्ट्रेलिया विरुद्ध ६१ सिक्सर लगावले होते. तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ऑस्ट्रेलिया विरोधात ६० सिक्सर लगावले आहेत.
रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण २१२ सिक्सर लगावले आहेत. त्यापैकी वन-डे मॅचेसमध्ये त्याच्या नावावर १३२ सिक्सर आहेत, टेस्ट मॅचेसमध्ये २५ आणि टी-२० क्रिकेटमध्ये ५१ सिक्सर आहेत.