वर्ल्ड कपसाठी भारतीय खेळाडूंनी आयपीएलमध्ये किती खेळावं? सचिन म्हणतो...

३० मेपासून इंग्लंडमध्ये क्रिकेट वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे.

Updated: Mar 18, 2019, 09:52 PM IST
वर्ल्ड कपसाठी भारतीय खेळाडूंनी आयपीएलमध्ये किती खेळावं? सचिन म्हणतो... title=

मुंबई : ३० मेपासून इंग्लंडमध्ये क्रिकेट वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे. त्याआधी भारतीय खेळाडू आयपीएलमध्ये व्यस्त असणार आहेत. पण वर्ल्ड कपचं महत्त्व लक्षात घेता भारतीय खेळाडूंनी आयपीएल दरम्यान विश्रांती घ्यावी, अशी मागणी होत आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने याबाबत त्याचं मत व्यक्त केलं आहे. वर्ल्ड कपसाठीची प्रत्येक खेळाडूची तयारी ही वेगळ्या पद्धतीची असते. त्यामुळे त्यांच्यावर येणारा शारिरिक तणावही वेगळ्या पद्धतीचा असतो, असं सचिन पीटीआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हणाला.

आयपीएल सुरु असताना विश्रांती घेण्याचा निर्णय आणि त्याची जबाबदारी ही प्रत्येक खेळाडूची आहे, असं वक्तव्य भारताचा कर्णधार विराट कोहलीने केलं होतं. विराटच्या या वक्तव्याचं सचिन तेंडुलकरने समर्थन केलं आहे.

'आपल्याला विश्रांतीची कधी गरज आहे, हे प्रत्येक खेळाडूला कळलं पाहिजे. हा निर्णय घेण्याची जबाबदारी प्रत्येक खेळाडूची आहे. जसप्रीत बुमराहच्या शरिरावर येणारा ताण हा विराटच्या शारिरिक ताणापेक्षा वेगळा आहे. महेंद्रसिंग धोनीचा ताण आणखी वेगळा असेल. हे सगळे खेळाडू अनुभवी आहेत आणि ते योग्य निर्णय घेतील', असा विश्वास सचिनने व्यक्त केला.

काय म्हणाला होता विराट?

काही दिवसांपूर्वी विराट कोहलीनेही असंच वक्तव्य केलं होतं. मी जर १०, १२ किंवा १५ मॅच खेळू शकत असेन, तर प्रत्येक खेळाडू तेवढ्याच मॅच खेळू शकेल, असं नाही. इतर खेळाडूंचं शरीर त्यांना जास्त किंवा कमी मॅच खेळण्यासाठी साथ देईल, असं विराट म्हणाला होता.

'खेळाडूंवर येणाऱ्या शारिरिक तणावाबद्दल आयपीएलच्या फ्रॅन्चायजीसोबत चर्चा झाली आहे,' असं भारतीय निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद आधीच म्हणाले आहेत. पण आता कोहलीने ही सगळी जबाबदारी खेळाडूंवर टाकली आहे.

'आम्ही खेळाडूंना स्वत:चा निर्णय स्वत: घेऊन याबाबत फ्रॅन्चायजींना सूचना देण्याची जबाबदारी दिली आहे. आमचे फिजियो पॅट्रिक फरहार्ट हे आयपीएलदरम्यान खेळाडूंच्या संपर्कात असतील. आम्ही एक ठराविक वेळ सांगू, या वेळेमध्ये खेळाडू विश्रांती करू शकतील. त्यांना या संधीचा आरामासाठी फायदा करुन घेता येईल. वर्ल्ड कपसाठी सगळ्या गोष्टींवर लक्ष दिलं जाईल,' असं वक्तव्य कोहलीने केलं.

'वर्ल्ड कप हा चार वर्षातून एकदा येतो पण आयपीएल प्रत्येकवर्षी असतं, पण आम्ही आयपीएल खेळण्यासाठी प्रतिबद्ध नाही, असा त्याचा अर्थ होत नाही. प्रत्येकाला चतुर बनावं लागेल. याची जबाबदारी खेळाडूची असेल. कोणालाही निर्णय घ्यायला मजबूर केलं जाणार नाही', असं कोहलीने स्पष्ट केलं.

'भारतीय टीमसाठी हे सत्र खूप व्यस्त होतं, पण टीममध्ये आत्मविश्वास आहे. खेळाडूंना आता आयपीएलची मजा घेण्याचा हक्क आहे', असं कोहलीला वाटतं.

आयपीएल २०१९ : क्लब महत्त्वाचा का देश खेळाडूंनी ठरवावं- बीसीसीआय