हैदराबाद : आयपीएल फायनलच्या रोमांचक मॅचमध्ये मुंबईचा १ रनने विजय झाला आहे. मुंबईने ठेवलेल्या १५० रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईने २० ओव्हरमध्ये चेन्नईने १४८/७ एवढा स्कोअर केला. कृणाल पांड्याच्या १८ व्या ओव्हरला चेन्नईने २० रन आणि मलिंगाच्या १६व्या ओव्हरला चेन्नईने २० अशा एकूण ४० रन काढल्या. पण तरीही मुंबईला हा सामना जिंकण्यात यश आलं.
मलिंगाच्या ओव्हरला २० रन आल्यानंतरही मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने त्याच्यावर विश्वास दाखवला आणि त्याला २०वी ओव्हर दिली. २०व्या ओव्हरमध्ये चेन्नईला विजयासाठी ९ रनची गरज होती, तेव्हा मलिंगाने फक्त ७ रन दिल्या. चेन्नईला शेवटच्या बॉलला जिंकण्यासाठी २ रन हवे होते, तेव्हा मलिंगाने शार्दुल ठाकूरला एलबीडब्ल्यू केलं.
चेन्नईकडून शेन वॉटसनने ५९ बॉलमध्ये सर्वाधिक ८० रन केले. तर फॅप डुप्लेसिसने १३ बॉलमध्ये २६ रनची खेळी केली. वॉटसन आणि डुप्लेसिस वगळता चेन्नईच्या दुसऱ्या कोणत्याही बॅट्समनला मोठी खेळी करता आली नाही.
मुंबईचा या मॅचमध्ये विजय झाला असला तरी त्यांची फिल्डिंग मात्र खराब झाली. शेन वॉटसनला या मॅचमध्ये ३ जीवदानं मिळाली. मलिंगाने वॉटसनचा एक कॅच सोडला तर राहुल चहरने वॉटसनचे दोन कॅच सोडले. याचबरोबर मुंबईने सुरुवातीला ओव्हर थ्रोच्या ४ रन दिल्या. विकेट कीपर क्विंटन डिकॉकनेही बुमराहच्या बॉलिंगवर १९व्या ओव्हरचा शेवटचा बॉल हातातून सोडला यामुळे चेन्नईला ४ रन मिळाल्या.
मुंबईच्या जसप्रीत बुमराहने सर्वोत्तम बॉलिंग केली. बुमराहने त्याच्या ४ ओव्हरमध्ये फक्त १४ रन देऊन २ विकेट घेतल्या. तर राहुल चहरनेही ४ ओव्हरमध्ये १४ रन देऊन १ विकेट घेतली. कृणाल पांड्याने ३ ओव्हरमध्ये ३९ रन देऊन १ विकेट घेतली. लसिथ मलिंगाने ४ ओव्हरमध्ये ४९ रन देऊन १ विकेट घेतली.
टॉस जिंकून पहिले बॅटिंग करणाऱ्या मुंबईने २० ओव्हरमध्ये १४९/८ एवढा स्कोअर केला. कायरन पोलार्डने २५ बॉलमध्ये सर्वाधिक ४१ रन केले, यामध्ये ३ फोर आणि ३ सिक्सचा समावेश होता. चेन्नईच्या टीमने शेवटच्या १२ बॉलमध्ये फक्त १३ रन दिले.
टॉस जिंकून पहिले बॅटिंग करणाऱ्या मुंबईची सुरुवात चांगली झाली. ४.५ ओव्हरमध्ये मुंबईने ४५ रन केले. पण यानंतर मुंबईला लागोपाठ २ धक्के बसले. क्विंटन डिकॉक आणि कर्णधार रोहित शर्मा लगेचच आऊट झाले. सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांनी मुंबईचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. कृणाल पांड्याही स्वस्तात बाद झाला. या मोसमात जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या हार्दिक पांड्याने १० बॉलमध्ये १६ रन केले.
चेन्नईकडून दीपक चहरने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या, तर शार्दुल ठाकूर आणि इम्रान ताहिरला प्रत्येकी २-२ विकेट मिळाल्या.
या विजयाबरोबरच मुंबई आणि रोहित शर्माच्या नावावर नवा विक्रम झाला आहे. ४ वेळा आयपीएल जिंकणारी मुंबई ही एकमेव टीम आहे. याआधी २०१३, २०१५ आणि २०१७ साली मुंबईने आयपीएल जिंकली होती. तसंच ४ आयपीएल जिंकवून देणारा रोहित हा एकमेव कर्णधार आहे.
रोहितनंतर धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने तीनवेळा आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. चेन्नईने २०१०, २०११ आणि २०१८ साली आयपीएल स्पर्धा जिंकली होती.