IPL 2019: मुंबईने पराभवाचा बदला घेतला, दिल्लीवर दणदणीत विजय

दिल्लीविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईचा ४० रननी दणदणीत विजय झाला आहे.

Updated: Apr 18, 2019, 11:47 PM IST
IPL 2019: मुंबईने पराभवाचा बदला घेतला, दिल्लीवर दणदणीत विजय title=

नवी दिल्ली : दिल्लीविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईचा ४० रननी दणदणीत विजय झाला आहे. मुंबईने ठेवलेल्या १६९ रनचा पाठलाग करताना दिल्लीला २० ओव्हरमध्ये १२८/९ एवढाच स्कोअर करता आला. मुंबईकडून राहुल चहरने सर्वोत्तम बॉलिंग केली. राहुल चहरने ४ ओव्हरमध्ये १९ रन देऊन ३ विकेट घेतल्या. तर जसप्रीत बुमराहला २ विकेट मिळाल्या. लसिथ मलिंगा, हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्याला प्रत्येकी एक-एक विकेट घेण्यात यश आलं. दिल्लीकडून शिखर धवनने सर्वाधिक ३५ रन केल्या.

मुंबईने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात चांगली झाली. पण ४९ रनवर शिखर धवनची विकेट गेल्यानंतर मात्र दिल्लीची बॅटिंग गडगडली. मुंबईच्या स्पिनरनी दिल्लीला लागोपाठ धक्के दिले.

या मॅचमध्ये मुंबईने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला होता. हार्दिक पांड्याच्या फटकेबाजीमुळे मुंबईने २० ओव्हरमध्ये १६८/५ एवढा स्कोअर केला. कृणाल पांड्याने २६ बॉलमध्ये नाबाद ३७ रनची खेळी केली. तर हार्दिक पांड्याने १५ बॉलमध्ये ३२ रन कुटले. यामध्ये २ फोर आणि ३ सिक्सचा समावेश होता. मुंबईने शेवटच्या ३ ओव्हरमध्ये तब्बल ५० रन काढल्या.

रोहित शर्मा आणि क्विंटन डिकॉकने पुन्हा एकदा मुंबईला चांगली सुरुवात करून दिली. या दोघांमध्ये ६.१ ओव्हरमध्ये ५७ रनची पार्टनरशीप झाली. पण रोहित शर्माची विकेट गेल्यानंतर मुंबईला धक्के बसायला सुरुवात झाली. दिल्लीकडून कागिसो रबाडाने सर्वाधिक २ विकेट घेतल्या, तर अमित मिश्रा आणि अक्सर पटेलला प्रत्येकी १-१ विकेट मिळाली.

या मॅचमध्ये मुंबई इशान किशन आणि बेहरनडॉर्फ यांच्याशिवाय मैदानात उतरली होती. त्यांच्याऐवजी बेन कटिंग आणि जयंत यादव यांना संधी देण्यात आली होती. पण दोघांनाही चमकदार कामगिरी दाखवता आली नाही.

यंदाच्या मोसमात दिल्लीविरुद्धच्या पहिल्या मॅचमध्ये मुंबईचा पराभव झाला होता. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या मॅचमध्ये ऋषभ पंतने वादळी खेळी केली होती. तर मागच्या वर्षी दिल्लीच्याच मैदानात मुंबईला पराभव पत्करावा लागला होता. या पराभवामुळे मुंबईचं मागच्या मोसमात प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याचं स्वप्न भंगलं होतं. या विजयामुळे मुंबईने मागच्या दोन्ही पराभवाचा वचपा काढला आहे.

या विजयाबरोबरच मुंबई पॉईंट्स टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. यंदाच्या मोसमात खेळलेल्या ९ मॅचपैकी ६ मॅचमध्ये मुंबईचा विजय झाला आहे, तर ३ मॅचमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. मुंबईच्या खात्यात सध्या १२ पॉईंट्स आहेत. १४ पॉईंट्ससह चेन्नईची टीम पहिल्या क्रमांकावर आहे.