IPL 2019: ६ पराभवानंतर पहिला विजय, तरी विराटला धक्का

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात लागोपाठ ६ पराभवांचा सामना करावा लागल्यानंतर सातव्या मॅचमध्ये बंगळुरूचा विजय झाला.

Updated: Apr 14, 2019, 05:12 PM IST
IPL 2019: ६ पराभवानंतर पहिला विजय, तरी विराटला धक्का title=

मोहाली : आयपीएलच्या यंदाच्या मोसमात लागोपाठ ६ पराभवांचा सामना करावा लागल्यानंतर सातव्या मॅचमध्ये बंगळुरूचा विजय झाला. पंजाबने ठेवलेले १७४ रनच्या आव्हानाचा पाठलाग बंगळुरूने ४ बॉल राखून पूर्ण केलं. बंगळुरुकडून सर्वाधिक ६७ रन कर्णधार विराट कोहलीने केले. तर एबी डीव्हीलियर्सने नॉटआऊट ५९ रनची महत्वपूर्ण खेळी केली.

एकीकडे बंगळुरूने यंदाच्या मोसमातला पहिला विजय मिळवला असला, तरी त्यांचा कर्णधार विराट कोहलीला मोठा धक्का बसला आहे. स्लो ओव्हर रेटमुळे विराट कोहलीला १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

आयपीएलकडून देण्यात आलेल्या अधिकृत वक्तव्यानुसार 'स्लो ओव्हर रेटसाठी असलेल्या आयपीएल आचार संहितेनुसार बंगळुरूच्या टीमचा हा पहिला अपराध होता. यासाठी कोहलीवर १२ लाख रुपयांचा दंड लावण्यात आला.' याआधी राजस्थानचा कर्णधार अजिंक्य रहाणे आणि मुंबईचा कर्णधार रोहित शर्मावरही अशाप्रकारे कारवाई करण्यात आली होती.

'या मोसमामध्ये आमची कामगिरी निराशाजनक झाली. पण प्रत्येक खेळाडूला चांगली कामगिरी करायची आहे, मॅच जिंकल्यामुळे मी खुश आहे. मागच्या काही मॅचमध्ये आमचं नशीब खराब होतं. एवढ्या निराशाजनक कामगिरीनंतरही खेळाडूंना चांगलं खेळायचं आहे. १९० रनचा स्कोअर या खेळपट्टीवर आव्हानात्मक होता. पण पंजाबच्या टीमला १७०च्या आसपास रोखण्यात आम्हाला यश आलं. क्रिस गेल शेवटपर्यंत बॅटिंग करेल, हे आम्हाला माहिती होतं. आम्हाला डॉट बॉल टाकायच्याही बऱ्याच संधी मिळाल्या. ८ ओव्हरमध्ये ६० रन देऊन आम्ही ४ विकेट घेतल्या', अशी प्रतिक्रिया बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीने पंजाबविरुद्ध ८ विकेटने मिळवलेल्या विजयानंतर दिली आहे.