IPL 2020 : ...म्हणून विराट चार्टर प्लेनने दुबईला रवाना

कोरोना व्हायरसमुळे आयपीएलच्या १३व्या मोसमाचं आयोजन युएईमध्ये करण्यात आलं आहे.

Updated: Aug 22, 2020, 10:08 PM IST
IPL 2020 : ...म्हणून विराट चार्टर प्लेनने दुबईला रवाना  title=

दुबई : कोरोना व्हायरसमुळे आयपीएलच्या १३व्या मोसमाचं आयोजन युएईमध्ये करण्यात आलं आहे. यासाठी सगळ्या टीम रवाना व्हायला सुरुवात झाली आहे. बंगळुरूची टीमही २१ ऑगस्टला दुबईमध्ये पोहोचली, पण त्यांच्यासोबत कर्णधार विराट कोहली उपस्थित नव्हता. विराट टीमसोबत युएईला का गेला नाही? असा प्रश्न विचारला जाऊ लागला. 

विराटच्या अनुपस्थितीबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्यावर अखेर आरसीबीने विराटच्या एका ट्विटला रिट्विट करत तो आधीच दुबईला पोहोचल्याची माहिती दिली. विराट कोहली चार्टर प्लेनने दुबईला रवाना झाला. पण विराटने असं का केलं, याबाबतची माहिती आता समोर आली आहे. 

आरसीबीने टीमच्या सगळ्या भारतीय खेळाडूंना बंगळुरूला पोहोचायला सांगितलं होतं. बंगळुरू पोहोचल्यानंतर सगळ्या खेळाडूंना दीड आठवडा क्वारंटाईन करण्यात आलं. या कालावधीमध्ये सगळ्या खेळाडूंची तीनवेळा कोरोना टेस्ट करण्यात आली.

कोरोना टेस्टचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरच क्रिकेटपटूंना विमान प्रवासाची परवानगी देण्यात आली. देशातल्या वाढलेल्या कोरोना व्हायरसमुळे हा निर्णय घेण्यात आला. युएईमध्येही शेवटच्या ७२ तासांच्या आत कोरोना व्हायरसचा रिपोर्ट सोबत ठेवणं अनिवार्य करण्यात आलं आहे. पण विराट कोहली या सगळ्यामध्ये नव्हता, तसंच तो बंगळुरूलाही गेला नव्हता.

विराटने भाड्याने घेतलं विमान 

बैंगलोर मिररने दिलेल्या वृत्तानुसार विराट कोहली चार्टर प्लेनने दुबईला रवाना झाला. त्याआधी विराटने मुंबईमध्येच आपल्या घरी क्वारंटाईनची प्रक्रिया पूर्ण केली. तसंच कोरोना टेस्टही केल्या. त्यामुळे जेव्हा आरसीबीची टीम बंगळुरूवरून दुबईला गेली तेव्हाच विराट मुंबईवरून दुबईसाठी रवाना झाला.

कोरोनाचा धोका टाळण्यासाठी उचललं पाऊल

आरसीबी मागच्या १२ मोसमापासून आयपीएल विजयाचा दुष्काळ मिटवण्यासाठी मैदानात उतरणार आहे. २००९, २०११ आणि २०१६ साली आरसीबी आयपीएलच्या फायनलमध्ये पोहोचली. २०१४ सालीही युएईमध्ये झालेल्या आयपीएलच्या काही मॅचमध्ये आरसीबीची कामगिरी उल्लेखनीय राहिली. त्यामुळे त्यांना या मोसमाकडूनही मोठी अपेक्षा आहे. यासाठी विराट कोहली त्यांच्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचा आहे. आयपीएलमध्ये विराट सर्वाधिक रन करणारा खेळाडूही आहे. 

विराटला मुंबईवरून बंगळुरूला आणणं आणि बंगळुरूवरून दुबईला घेऊन जाणं यामध्ये कोरोना संक्रमित होण्याचा धोका होता, म्हणूनच विराटला एकट्याला मुंबईवरून दुबईला स्पेशल विमानाने पाठवण्याची सूट देण्यात आली होती.